शरद पवारांना कोंडीत पकडण्यासाठी शिंदे गट टाकणार डाव; राज्यसभेसाठी हायव्होल्टेज ड्रामा
Rajyasabha Election 2026: राज्यसभेच्या निवडणुकीसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील सात जागांसह १० राज्यांमध्ये एकूण ३० जागांसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. पण शरद पवार यांच्या विरोधात यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने रोहित टिळक यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यंदाची राज्यसभेची निवडणूकदेखील चुरशीची होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, संपूर्ण निवडणूक समीकरण आता शरद पवारांभोवती फिरत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, महायुतीचे सहा आणि महाविकास आघाडीचा एक उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी शरद पवारांकडे लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महायुती आणि विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेने या निवडणुकीत शरद पवार यांची कोंडी करण्याची योजना आखल्याचे दिसून येत आहे. शिंदे गटाला दुसरी जागा जिंकायची असेल तर त्यांना अतिरिक्त मतांची गरज आहे. त्यामुळे सातव्या जागेसाठी चुरस वाढणार आहे. शरद पवार यांच्याविरोधात रोहित टिळक यांना उमेदवारी देऊन शिंदे गटाने पहिला मोठा डाव टाकला आहे.
तर शिंदे गटाकडून आणखी एक उमेदवार रिंगणात उतरवला जाण्याची शक्यता आहे. यात रोहित टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर सोलापूरमधील शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योति वाघमारे यांनादेखील उमेदवारी अर्ज भरण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. शरद पवारांविरुद्ध (Sharad Pawar) थेट राजकीय आव्हान उभे करण्यासाठी ही रणनीती आखली जात आहे असे मानले जाते. त्यामुळे राज्यसभेतील राजकीय समीकरणेदेखील बदलण्याची शक्यता आहे.
भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये माजी मंत्री विनोद तावडे, आरपीआय (आठवले गट) प्रमुख आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, हिंगोली भाजप नेते रामराव वडकुते आणि नागपूर भाजप नेत्या माया इवनाते यांचा समावेश आहे.
Yashomati Thakur : “AI च्या बाता करणाऱ्या सरकारला…”, मेळघाटातील समस्यांवरून यशोमती ठाकूर
महाविकास आघाडी (MVA) कडून शरद पवार यांचे नाव चर्चेत आहे. दरम्यान, अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांचे नाव चर्चेत आहे. पण ठाकरे गटाने अद्याप आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही, ज्यामुळे सस्पेंस निर्माण झाला आहे. राज्यसभा निवडणुकीत, कोणत्याही उमेदवाराला जिंकण्यासाठी किमान ३७ पहिल्या पसंतीच्या मतांची आवश्यकता असते. सध्याच्या संख्याबळाच्या आधारे, महायुतीला सुमारे २३२ आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगितले जाते.
शिंदे गटाकडे अंदाजे २० अतिरिक्त मते आहेत, तर अजित पवार गटाकडे तीन मते असल्याचे मानले जाते. परिणामी, राजकीय पक्ष आपापल्या मतांची गणिते आखण्यात व्यस्त आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्यसभेची निवडणूक खूपच रोमांचक होणार आहे. शरद पवार या राजकीय आव्हानाला कसे तोंड देतात हे पाहणे विशेषतः मनोरंजक असेल.






