विक्रोळीतील दरड कोसळून वडील-मुलीचा मृत्यू, आई-मुलगा गंभीर जखमी
landslide in Vikhroli : मुंबईतून एक मन हेलावणारी बातमी समोर आली आहे. विक्रोळी (पश्चिम) येथील जनकल्याण सोसायटी, वर्षा नगर परिसरात शनिवारी पहाटे दरड कोसळली. डोंगराळ भागातील माती व दगड घसरून एका झोपडीवर कोसळले. या अपघतात वडील आणि मुलीचा मृत्यू झाला. तर आई आणि मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून आई आणि मुलावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज ( १६ ऑगस्ट ) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. त्यानंतर सकाळी ५.५० वाजता अधिकृत अद्ययावत माहिती देण्यात आली. दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल (MFB), पोलिस व पालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि तातडीने बचावकार्य सुरू केले. राजावाडी रुग्णालयाचे डॉक्टर निखिल (AMO) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन जण मृतावस्थेत रुग्णालयात आणले गेले, तर दोघांवर ट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. यात सुरेश मिश्रा (५०, पुरुष) आणि शालू मिश्रा (१९, महिला) यांचा मृत्यू झाला असून आरती मिश्रा (४५, महिला) आणि ऋतुराज मिश्रा (२०, पुरुष) यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शनिवारी सकाळपासून मुंबईत सतत पाऊस पडत आहे, त्यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्याच वेळी, नाशिक, पुणे, सातारा आणि जळगावसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो, ज्यामुळे जनजीवन प्रभावित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर आवाहन केले आहे की लोकांनी फक्त महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडावे. पोलिसांनी सांगितले की अनेक ठिकाणी पाणी साचले आहे आणि दृश्यमानता कमी झाली आहे, म्हणून विनाकारण प्रवास करू नका. आपत्कालीन परिस्थितीत, 100/112/103 वर कॉल करण्याचा सल्ला दिला जातो.
Zodiac Sign: गौरी योगामुळे कर्क राशीसह या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब, श्रीकृष्णांचा राहील आशीर्वाद
पावसाच्या वेळी मुंबईत भूस्खलनाच्या घटना सतत चिंता निर्माण करत आहेत. गेल्या महिन्यात भांडुपच्या एका निवासी भागातही भूस्खलन झाले होते. काही घरे आधीच रिकामी करण्यात आली होती, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली. विक्रोळीच्या घटनेने प्रशासनाला पुन्हा सतर्क केले आहे. मुसळधार पावसात लोकांना सावधगिरी बाळगण्याचे, सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास न करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.