मनसेच्या प्रयत्नानंतर अटल सेतूवरील इलेक्ट्रिक वाहनांना टोलमुक्त प्रवासाची सोय
Mumbai News: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यापुढे अटल सेतूवरून जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना टोल द्यावा लागणार नाही. खासगी तसेच सरकारी इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांसाठी गुरुवार, २१ ऑगस्टपासून टोलमुक्ती जाहीर करण्यात आली असून, आजपासून (२२ ऑगस्ट) प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे.
ही सुविधा एप्रिल महिन्यात जाहीर केली गेली होती, पण अटल सेतूवर ती आता प्रत्यक्ष लागू होत आहे. तसेच, राज्यातील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि समृद्धी महामार्गावरही येत्या दोन दिवसांत ही टोलमुक्ती लागू होण्याचे संकेत मिळाले आहेत. या निर्णयामुळे इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर व किफायतशीर होईल, तसेच पर्यावरणपूरक वाहतूक वाढीस मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अटल सेतूवरून जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना (EV) टोलमुक्त प्रवासाची सुविधा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी या वाहनांना टोलमुक्त प्रवासासाठी उपलब्ध असलेला अध्यादेश असूनही, व्यवहारात अडचणी येत होत्या. मनसे प्रवक्ते योगेश चिल्ले आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अटल सेतूच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून इलेक्ट्रिक वाहनांना टोलमुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. या प्रयत्नांनंतर, महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने अधिसूचना जारी करत अटल सेतूवरून जाणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी टोल फ्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे नवी मुंबई ते मुंबई दरम्यानचे प्रवास करणाऱ्या EV वाहनधारकांसाठी आर्थिक दृष्टीने मोठा दिलासा मिळणार आहे. अटल सेतूवरील भरमसाठ टोलमुळे नागरिकांमध्ये झालेल्या नाराजीचा काहीसा तोडगा यामुळे निघाल्याचेही मानले जात आहे. मनसे वाहतूक सेनाचे रायगड जिल्हा संघटक सचिन जाधव म्हणाले, “ही सुविधा इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी खूप मदत करणारी ठरेल. मनसेच्या प्रयत्नांमुळेच ही प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होऊ शकली.”
महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोल माफी लागू केली असून, हा निर्णय वाहतूक क्षेत्रातून होणारे कार्बन उत्सर्जन, प्रदूषणकारी वायू आणि हरित गृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी एप्रिल महिन्यात जाहीर केलेल्या महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणाचा (MEV Policy) भाग आहे.
या धोरणानुसार, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू आणि समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांना आणि इलेक्ट्रिक बसांना टोलमाफीची सुविधा मिळणार आहे. तसेच, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांना टोलमध्ये ५० टक्के सवलत देण्याची घोषणा देखील करण्यात आली होती.
या निर्णयामुळे राज्यातील इलेक्ट्रिक वाहनधारकांना प्रवासाचा खर्च कमी होण्यास मदत होईल, तसेच पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन मिळणार आहे. इलेक्ट्रिक बसेससह खासगी व प्रवासी हलकी चारचाकी वाहनांन, राज्य परिवहन वाहने आणि शहरी परिवहन उपक्रमांतील प्रवासी वाहनांना टोलमाफी कऱण्यात आली आहे. पण मालवाहक इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी करण्यात आलेली नाही.