(फोटो- टीम नवराष्ट्र)
राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली. त्यात महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील असे वाटत होते. मात्र केवळ हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीने देखील जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर महायुती सावधपणे पाऊले उचलताना दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यामुळे महायुतीच्या गोटात चर्चा, बैठकांचे सत्र सुरू आहे. दरम्यान अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांना काही कठोर सूचना केल्याचे समजते आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महायुतीच्या नेत्यांची सह्याद्री अतिथीग्रहावर एक महत्व्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या बैठकीत अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. महायुतीतील वाद चव्हाट्यावर न येण्यासाठी जाहीर वक्तव्ये करताना काळजी घ्यावी अशी सूचना शहा यांनी केली आहे.
सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या महायुतीच्या बैठकीत अमित शहा यांनी काही कठोर सूचना राज्यातील प्रमुख नेत्यांना केल्याचे समजते आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महत्वाच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतील चूक विधानसभेत टाळावी अशी सूचना शहा यांनी केली आहे. नेत्यांनी बोलताना संयम ठेवावा. वादग्रस्त वक्तव्ये करू नये अशी कठोर सूचना शहा यांनी दिली आहे. महायुती एकजूट आहे असे चित्र राज्यासमोर जायला हवे, अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ देऊ नका असे शहा म्हणाले आहेत.
महायुतीत जागावाटपात मित्रपक्षाची उडी
महायुतीतील काही घटक पक्षांनी जास्त जागांची मागणी केल्याने किंवा चर्चा केल्याने महायुतीचे टेन्शन वाढले आहे. कारण महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने महायुतीकडे ३३ जागांची मागणी केली आहे. महायुतीच्या तीन प्रमुख पक्षांमध्येच जागांवरून रस्सीखेच सुरू असताना आणखी एका घटक पक्षाने त्यात उडी मारली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आम्हाला ३३ जागा द्याव्यात तसेच राज्यसभेसाठी एक जागा मिळावी अशी मागणी केली आहे. आम्हाला सन्मानजनक जागा मिळतील असे म्हणून पीपल्स रिपब्लिकन पक्षाने नांदेडच्या देगलूरमध्ये उमेदवार देखील जाहीर केला आहे. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख जोगेंद्र कवाडे यांनी ही घोषणा केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्हाला सन्मानजनक जागा मिळाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. आगामी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आम्हाला १ जागेची संधी देण्यात यावी. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांमध्ये देखील एक जागा मिळावी. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्हाला ३३ जागा हव्या आहेत. तेवढ्या जागा नाही मिळाल्या तरी आम्ही किमान ५ जागांसाठी आग्रही असणार आहोत असे जोगेंद्र कवाडे म्हणाले.