Photo Credit- Team Navrashtra
Marathi Breaking news live updates: पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पीएमपीएलच्या ताफ्यात लवकरच १,००० नवीन बसांचा समावेश केला जाणार आहे. बुधवारी पीएमआरडीएने ५०० बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकाही ५०० बस पुरवणार आहे.
14 Feb 2025 08:57 PM (IST)
प्रपोज डे, टेडी डे, किस डे नंतर अखेर अनेक जणांचा आवडता दिवस आज उजाडला आहे. तो दिवस म्हणजेच व्हॅलेंटाइन डे. या दिवशी अनेक जण आपल्या प्रिय व्यक्तीसोबत निवांत वेळ घालवताना दिसतात. तर काही जण फिरायला जातात. पण जगातील सर्वात सुंदर क्षण म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीसोबत आपलं लग्न होणे. याहीपेक्षा सुंदर गोष्ट म्हणजे आपण करत असलेल्या कार्यात जोडीदाराने सुद्धा आनंदाने भाग घेणे. आज आपण अशीच एक लव्ह स्टोरीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने प्रेमाचा खरा अर्थ काय असतो त्याबद्दल सांगितले आहे.
14 Feb 2025 07:48 PM (IST)
महायुती सरकारने घेतलेल्या मुलींच्या फी माफीसाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ॲक्शन मोडवर आले असून, आज त्यांनी पुण्यातील गरवारे महाविद्यालयास अचानक भेट देऊन मुलींच्या फी माफी निर्णयाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. तसेच, राज्यातील १०० महाविद्यालयांना अचानक भेट देणार असल्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
14 Feb 2025 07:23 PM (IST)
पुरंदर मधील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव आदी सात गावांमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला गती देण्यासाठी राज्य सरकारकडून मेट्रो, रेल्वे, जोड रस्त्यांच्या ‘कनेटिव्हिटीला’ प्राधान्य देण्यात आले आहे. त्याअंतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) अर्थसंकल्प आणि मेट्रोच्या एकात्मिक वाहतूक आराखड्यात अनेक पर्यायी मार्गांची आखणी केली आहे. त्यामुळे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा भविष्यातील प्रवास सुकर होण्याच्या दृष्टीने जोरदार बांधणी सुरु असल्याचे दिसत आहे.
14 Feb 2025 06:26 PM (IST)
धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची कबुली सुरेश धस यांनी दिली आहे. रुग्णालयातून मुंडे सुटल्यानंतर त्यांच्या तब्येची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचे धस म्हणाले. दरम्यान, या भेटी विषयी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मला या भेटीविषयी माहीत नाही. मात्र, सुरेशअण्णा आमच्यासोबतच आहे.
14 Feb 2025 05:02 PM (IST)
राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशानंतर आत्ता कोकणात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार पाडायला सुरुवात केली आहे. दापोलीमधील ५ नगरसेवकांना उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
14 Feb 2025 04:47 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान केल्यानंतर महाविकास आघाडीत तणाव वाढला आहे. यामुळे शिवसेना (ठाकरे गट) नाराज झाली असून खासदार संजय राऊत यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राऊतांवर प्रत्युत्तर देत स्पष्ट केले की, शरद पवार कुठल्या मंचावर जातील, हे ठरवण्याचा अधिकार संजय राऊतांना नाही.
14 Feb 2025 03:59 PM (IST)
हजारीबागमध्ये गर्भलिंग निर्धारण आणि हत्येचा एक धक्कादायक खुलासा झाला आहे. एका अल्ट्रासाऊंड तज्ञाने महिलेच्या पोटात वाढणाऱ्या मुलाला मुलगी असल्याचे घोषित केले. मग त्याने गर्भपाताच्या नावाखाली पैसे गोळा केले. पण गर्भपातानंतर संपूर्ण खेळ उघडकीस आला. तेव्हापासून पीडिता आणि तिचे कुटुंब पश्चात्ताप करत आहेत
14 Feb 2025 02:57 PM (IST)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नांदेड जिल्हा सहसंपर्क प्रमुख दत्ता कोकाटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कोकाटे हे आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यामुळे ठाकरे सेनेला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही.
14 Feb 2025 01:53 PM (IST)
अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध कठोर भूमिका घेतली असून, पुन्हा एकदा अनेक भारतीयांना त्यांच्या मूळ देशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी भरलेले एक विमान १५ फेब्रुवारी २०२४ रोजी अमृतसरमध्ये उतरणार आहे. याआधीही अमेरिकेने अशाच स्वरूपाच्या मोहिमेत १०४ भारतीयांना अमृतसरमार्गे मायदेशी परत पाठवले होते.
14 Feb 2025 01:27 PM (IST)
नागरी सेवा परीक्षेत फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीने ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचे फायदे मिळवल्याचा आरोप असलेल्या माजी आयएएस प्रोबेशनर पूजा खेडकर यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (14 फेब्रुवारी 2025) 17 मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले.
14 Feb 2025 01:03 PM (IST)
माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गटाचा त्याग करत शिंदे गटात प्रवेश केला आणि धनुष्यबाण हाती घेतला. साळवींनी माजी खासदार विनायक राऊतांमुळे विधानसभेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याचा आरोप करत शिंदे गटात प्रवेश केला. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. "सत्ता गेल्यावर जो तडफडतो, त्याला शिवसैनिक म्हणत नाहीत," अशा शब्दांत त्यांनी साळवींवर हल्लाबोल केला.
14 Feb 2025 12:56 PM (IST)
न्यू इंडिया बँकेवर कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर अनेक निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या या निर्बंधानंतर, बँक ठेवीदारांना त्यांच्या खात्यात जमा केलेले त्यांचे कष्टाचे पैसे काढता येणार नाहीत. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक आता कोणतेही कर्ज देऊ शकणार नाही किंवा कोणतीही ठेव घेऊ शकणार नाही.
14 Feb 2025 11:13 AM (IST)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आणि वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तसेच मूर्तिजापूर मतदारसंघाचे माजी आमदार तुकाराम बिरकड यांचे अपघाती निधन झाले आहे. अकोला-मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर त्यांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत धडक देणारे मालवाहू वाहन ताब्यात घेतले असून, वाहनचालकाला अटक करण्यात आली आहे. या अनपेक्षित घटनेमुळे राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
14 Feb 2025 11:05 AM (IST)
राजन साळवी यांच्या शिंदे गटात प्रवेशानंतर कोकणासह मुंबईत शिवसेनेची ताकद वाढणार असून, आता कोकणातील कोणताही पदाधिकारी ठाकरे गटासोबत उरलेला नाही, असे महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केले. "ठाकरे गटाने आता जागं व्हावं, अन्यथा पुढील सहा महिन्यांत त्यांचा अंत होईल," असा खळबळजनक इशारा त्यांनी दिला.
14 Feb 2025 10:45 AM (IST)
मावळ तालुक्यातील देहूरोड, गांधीनगर परिसरात वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान अंदाधुंद गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सुरुवातीच्या माहितीनुसार, जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याचे समोर आले आहे.
14 Feb 2025 09:53 AM (IST)
महिला व बालविकास विभागाने अंगणवाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली आहे. एकूण १८,८८२ रिक्त पदे भरण्यात येणार असून, याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. या भरतीअंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये –अंगणवाडी सेविका – ५,६३९ पदे आणि अंगणवाडी मदतनीस – १२,३४२ पदे या संधीमुळे अनेक उमेदवारांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. भरती प्रक्रियेची अधिकृत माहिती आणि अर्ज करण्यासाठी लवकरच अधिकृत सूचना जाहीर केली जाणार आहे.
14 Feb 2025 09:46 AM (IST)
भाजप नेते एन. बिरेन सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच मणिपूरच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. एन. बिरेन सिंग यांनी मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर केंद्र सरकारने गुरुवारी हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. एन. बिरेन सिंग यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रपती राजवटीचा निर्णय घेण्यात आला आहे.
14 Feb 2025 09:44 AM (IST)
बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृतरित्या प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे कोकणातील ठाकरे गट कमकुवत झाला असला, तरी शिंदे गटातही अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिंदेसाहेबांनी आम्हाला हे मढ लादू नये. जर त्यांचा पक्षप्रवेश झाला असेल, तरी त्यांच्या हस्तक्षेपाला आम्ही आमच्या मतदारसंघात थारा देणार नाही,” असे संतप्त प्रतिक्रिया काही पदाधिकाऱ्यांनी दिल्या.
14 Feb 2025 09:43 AM (IST)
नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहणारे राज्याचे मत्स्य व्यवसाय विकासमंत्री नितेश राणे यांनी पुन्हा ‘त्या’ गावांना निधी देणार नसल्याचा इशारा दिला आहे. ‘ज्या गावांमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आहे, महाविकास आघाडीचे सरपंच असतील, त्या गावांना एक रुपयाचाही निधी देणार नाही’, असा इशारा त्यांनी दिला आहे.
14 Feb 2025 09:05 AM (IST)
शिवसेना (ठाकरे गट) चे नेते आणि रत्नागिरी-लांजाचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. त्यांनी ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा देत बुधवारी आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे कोकणातील ठाकरे गट कमकुवत झाला असून शिंदे गटाची ताकद वाढली आहे.
मात्र, राजन साळवी यांच्या प्रवेशामुळे कोकणातील शिंदे गटातील काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज झाले आहेत. विशेषतः राजापूर-लांजा मतदारसंघात या प्रवेशाला तीव्र विरोध दिसून येत आहे. अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात असंतोष व्यक्त केला असून काहींनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राजन साळवी यांच्या प्रवेशाने शिंदे गटाची ताकद वाढली असली, तरी स्थानिक स्तरावर गटबाजी निर्माण होण्याची शक्यता आहे.






