मुसळधार पावसामुळे रेल्वेची वाहतूक मंदावली, अंधेरी सबवेला नदीचं रुप (फोटो सौजन्य-X)
Mumbai Local Update News In Marathi : मुंबईत पुन्हा एकदा पावसाने कहर केला आहे. मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक मंदावली असून लोकल ट्रेन २० ते २५ मिनिटे उशिरा धावत आहेत. तसेच मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले आहे आणि वाहतूक कोंडी झाली आहे. तर दुसरीकडे अंधरेची सबवेला नदीचं रुप धारण केल्याचे पाहायला मिळत आहे.
आज (25 जुलै) सकाळपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. याचपार्श्वभूमीवर आज (२५ जुलै) दिवसभर मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे तर मुंबईतील लोकल वाहतूकीवर याचा परिणाम दिसून येत आहे.
पश्चिम उपनगरात काही वेळेसाठी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुन्हा दहा ते पंधरा मिनिटांपासून पावसाचा जोप वाढला आहे. या जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे पुन्हा पश्चिम उपनगरात सखल भागात पाणी भरायला सुरुवात होत आहे. तसेच पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक मंदावली आहे.
पश्चिम रेल्वे लोकल सेवा दर १० ते १५ मिनिट उशीराने धावत आहेत.
मध्य रेल्वेच्या लोकल सेवा दर १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहे.
हार्बर रेल्वेची सद्यस्थिती? – हार्बर रेल्वे देखील १५ मिनिटे उशिराने धावते.
अंधेरी सबवेने अक्षरशः नदीचे रूप घेतले आहे. वरच्या भागातून आलेलं मोठ्या प्रमाणातलं पाणी थेट सबवेमध्ये शिरत आहेत. परिणामी संपूर्ण सबवे पाण्याखाली गेलेलं आहे. परिणामी, वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे आणि गाड्या इतर मार्गांवर वळवल्या जात आहेत. यामुळे, अंधेरी परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे आणि नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.
कोणत्या भागात अलर्ट
रेड अलर्ट : रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
ऑरेंज अलर्ट: मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, वर्धा, नागपूर.
यलो अलर्ट : पालघर, नाशिक घाटमाथा, सातारा, कोल्हापूर, अमरावती, हिंगोली, नांदेड.