रमीचे प्रकरणानंतर माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी राजकीय हालचालींना वेग
Manikrao Kokate News: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे विधानभवनातील रमीचे प्रकरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले असून चारही बाजूंनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे. त्यानंतर कोकाटे यांच्या संभाव्य खांदेपालटाचा पर्याय चर्चेत असून, यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे सांगितले जातती आहे. या चर्चेत कोकाटे यांच्या जागी नवीन चेहरा मंत्रिमंडळात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावर अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
काल (२४ जुलै) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे प्रकरणावर भाष्य करत “इजा झाला, बिजा झाला” म्हणत कारवाईच्या संकेत दिले होते. रमीच्या वादावर कोकाटेंशी चर्चा करून सोमवारी किंवा मंगळवारी निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता कोकाटे यांच्या पुढील राजकीय भवितव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षांतर्गत चर्चा आणि शिस्तभंग प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर येणारे निर्णय महत्त्वाचे ठरणार आहेत.
माणिकराव कोकाटेंविरोधात वातावरण तापल्यामुळे त्यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी दुसऱ्या व्यक्तीकडे त्यांच्या खात्याचा कारभार दिला जाऊ शकतो. मंत्रिपद जाण्यापेक्षा बदल करणे हे अधिक सोयीस्कर असल्याची चर्चा देवेंद्र फडणवीस आणि सुनील तटकरे यांच्यात झाल्याचे सांगितले जात आहे. माणिकराव कोकाटे यांचे कोणतेही स्पष्टीकरण सरकारसाठी फायदेशीर ठरणार नाही, अशी नाराजी फडणवीस यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर कोकाटे यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाी आहे. कोकाटे यांचा रमीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आपण कोणतीही चूक केली नाही, रमीची जाहीरात आल्याने मी ती स्किप करत असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते.
कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “मी माणिकराव कोकाटेंशी समोरासमोर चर्चा करणार आहे. त्यांनी ‘भिकारी’ असा उल्लेख केला, याबाबत मी स्पष्ट बोलणार आहे. मागे एकदा असंच घडलं होतं, तेव्हाही मी त्यांना समजावलं होतं. आता ‘इजा झाली, बिजा झाली’, तिसऱ्यांदा अशी वेळ येऊ नये, असं मी स्पष्टपणे कोकाटे यांना सांगितलं आहे,” असं ते म्हणाले. तसेच, यानंतर जेव्हा आमची भेट होईल, तेव्हा काय कारवाई करायची हे मी पाहीन,” असा ठाम इशाराही अजित पवारांनी दिला. या पार्श्वभूमीवर कोकाटेंच्या पुढील राजकीय स्थितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.