मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरायचा असतानाच राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी नियम बदलण्यात आले. ही प्रक्रियाच घटनाबाह्य असल्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकारला कळवलं आहे. त्यामुळे आघाडीला मोठा धक्का बसला असून अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची चिन्हे दिसत आहेत.
राज्य सरकारने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मंजूरी आवश्यक होती. मात्र, राज्यपालांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीच्या खुल्या मतदान पद्धतीवर बोट ठेवले आहे. यापूर्वी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होत असे. त्यामुळे निवडणूक पद्धतीत बदल करुन आवाजी मतदानाची पद्धत अंगीकारणे घटनाबाह्य असल्याचे राज्यपालांनी सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
काल रविवारी २६ डिसेंबर रोजी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन त्यांना विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया बदलण्यात आली असून त्याला मंजुरी देण्याची विनंती केली होती. त्यावर राज्यपालांनी उद्यापर्यंत सांगतो असं उत्तर दिलं होतं. त्यानुसार राज्यपालांनी आपला अभिप्राय कळवला असून थेट निवड प्रक्रियेवरच बोट ठेवलं आहे.
विधानसभा अध्यक्षपदाची निवड कोणत्याही परिस्थितीत हिवाळी अधिवेशनातच करायची यावर महाविकासआघाडीचे नेते ठाम आहेत. तसेच ही निवडणूक आवाजी पद्धतीनेच होईल, यासाठी महाविकासआघाडी आक्रमक आहे. त्यामुळे आता महाविकासआघाडी सरकार राज्यपालांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.