लालबागचा राजा (Photo credit - X)
मुंबई: अलिकडेच अनंत चतुर्दशी मोठ्या उत्साहात साजरी झाली. या निमित्ताने, मुंबईकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाला मोठ्या जल्लोषात निरोप दिला. मुंबईचा प्रसिद्ध लालबागचा राजा गणेशोत्सव नेहमीप्रमाणे या वर्षीही चर्चेत राहिला. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक शनिवारी सुरू झाली आणि भाविकांनी ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत बाप्पाला रविवारी निरोप दिला.
विसर्जन मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट
एकीकडे भक्तीमय वातावरण असतानाच, दुसरीकडे लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला काही अप्रिय घटनांमुळे गालबोट लागले. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी भाविकांना लक्ष्य केले. मिळालेल्या माहितीनुसार, लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत १०० हून अधिक मोबाईल चोरीच्या घटना घडल्या आहेत. अनेक भाविकांनी या संदर्भात कालाचौकी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या असून, पोलिसांनी आतापर्यंत १० गुन्हे दाखल केले आहेत.
यापैकी चार गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले असून, चोरीला गेलेले चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी चार आरोपींना अटकही करण्यात आली आहे. मोबाईल चोरीसोबतच सोन्याच्या चेन चोरीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. चेन चोरीच्या १२ प्रकरणांमध्ये पोलिसांनी दोन सोन्याच्या चेन जप्त केल्या असून १२ आरोपींना अटक केली आहे.
या प्रकरणांचा पुढील तपास सुरू असून, इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. मोठ्या गर्दीमुळे आणि उत्साहामुळे लालबागच्या राजाला निरोप देताना सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. यंदा विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू झाली असली, तरी समुद्रातील भरती-ओहोटीमुळे लालबागच्या राजाला तब्बल ८ तास पाण्यात थांबावे लागले.
या वर्षी लालबागच्या राजासाठी खास अत्याधुनिक तराफा तयार करण्यात आला होता. मात्र, याच तराफ्यामुळे विसर्जन मिरवणुकीला विलंब झाल्याचीही टीका झाली. लालबाग ते गिरगाव चौपाटीपर्यंतचा हा प्रवास सुमारे ३२ ते ३५ तासांचा असतो, आणि या वर्षीही विसर्जन सोहळा अनेक तास चालला.
मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी या परिस्थितीवर स्पष्टीकरण दिले. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, “लालबागच्या राजाचे विसर्जन भरती आणि ओहोटी वर अवलंबून असते. आम्ही चौपाटीवर पोहोचण्यापूर्वीच भरती सुरू झाली होती. त्यामुळे, भरती ओसरण्याची वाट पाहणे आवश्यक होते.” सुधीर साळवी यांनी रात्री साडे दहा ते अकरा वाजता विसर्जन पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली. त्यांनी पुढे सांगितले की, “लालबागचा राजा करोडो भाविकांचे श्रद्धास्थान आहे, त्यामुळे कोणतीही घाई न करता योग्य वेळेची वाट पाहणे महत्त्वाचे होते. उशिरा झालेल्या विसर्जनामुळे आम्ही सर्व भाविकांची दिलगिरी व्यक्त करतो.” या विलंबामुळे मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांचे मोलाचे सहकार्य लाभले, त्याबद्दल साळवी यांनी त्यांचे आभार मानले. माध्यमांनी केलेल्या सहकार्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.