(फोटो- टीम नवराष्ट्र)
मुंबई: उद्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे विसर्जन होणार आहे. उद्या अनंत चतुर्दशी आहे. अतिशय थाटामाटात, भक्तीमय वातावरणात सर्वजण बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक शांततेत, चांगल्या वातावरणात पार पाडावी यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी आणि अन्य ठिकाणी मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे.
मुंबईत विसर्जन मिरवणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मुंबई पोलिसांचे २० हजार जवान तैनात केले जाणार आहेत. यामध्ये ९ अप्पर पोलीस आयुक्त, ४० डीसीपी, ५६ एसीपी दर्जाचे अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. एसआरपीएफचे १० हजार जवान देखील तैनात केले जाणार आहेत. मुंबई महानगरपालिकेसोबत अनेक ठिकाणी तयारी करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
महिलांची सुरक्षा ही मुंबई पोलिसांची प्राथमिकता आहे. यासाठी साध्या वेशातील पोलीस, कंट्रोल रूम आणि निर्भया पथक अशा माध्यमातून पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. ठराविक व महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. काही आवश्यकता असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. मुंबई पोलीस वाहतूक विभागाचे देखील अडीच हजार अधिकारी आणि कर्मचारी तैनात असणार आहेत. २० हजारांपेक्षा जास्त कॉन्स्टेबल आणि अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. गर्दी मोठ्या प्रमाणात असेल त्यामुळे आपली व कुटुंबीयांची काळजी घ्या असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
पुण्यात देखील ६ हजार पोलिसांचा बंदोबस्त
पुणे शहरातील गणेशोत्सवाला दरवर्षी लाखो भाविक भेट देत असतात. मानाचे पाच गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती, भाऊ रंगारी गणपती आणि गणपती मंडळे व त्यांचे सजीव देखावे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक पुण्यनगरीत येत असतात. पुण्यातील गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला विशेष महत्व आहे. सांस्कृतिक, पारंपरिक पद्धतीने श्रीगणेशाची विसर्जन मिरवणूक काढली जाते. दरम्यान १७ तारखेला विसर्जन मिरवणूक होणार आहे. यासाठी आता पुणे पोलीस देखील सज्ज झाले आहेत. विसर्जन मिरवणुकीत पुणे पोलिसांचा तगडा बंदोबस्त बघायला मिळणार आहे.