बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : शहरातील मटका व्यावसायिक कृष्णा जाधव यांच्या खून प्रकरणातील जामिनावर सुटलेल्या दोघांकडून जाधव यांच्या सहकाऱ्यावर खुनी हल्ला करून त्याच्या खिशातील १३ हजार रुपयांची रोख रक्कम काढून घेतली. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी आरोपी सुनील संभाजी माने व विनोद शिवाजी माने या दोघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
गणेश बलभीम धोत्रे (वय २७, रा. नेवसे रोड, नायगावकर हॉस्पिटलच्या मागे, बारामती) यांनी पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा कृष्णा जाधव यांच्या मटक्या अड्ड्यावर काम करत होते व त्यांचे साथीदार होते. कृष्णा जाधव यांचा २०१८ मध्ये खून झालेला आहे. सदरच्या गुन्ह्यातून सुनील संभाजी माने व विनोद शिवाजी माने हे काही दिवसांपूर्वीच जामीनावर आलेले आहेत.
९ मे रोजी सायंकाळी फिर्यादी गणेश धोत्रे यांना सुनील संभाजी माने याने मोबाईल फोन करून बारामती शहरातील सातव चौक या ठिकाणी पत्रा शेडजवळ बोलवून घेतले. त्यांची दहशत असल्यामुळे सदरचा फिर्यादी तात्काळ त्या ठिकाणी आला. त्या ठिकाणी सुनील संभाजी माने व विनोद शिवाजी माने हे पांढऱ्या रंगाच्या कारमधून त्या ठिकाणी आणखी दोन लोकांसह आलेले होते.
त्यावेळी सुनील माने याने धोत्रे याला गाडी विक्रीतून तू खूप पैसे कमावले आहेत. तसेच तुझा मटक्याचा धंदा चालू असल्याने दोन लाख रुपये देण्याची मागणी केली. त्यावेळी फिर्यादी गणेश धोत्रे याने आपली परिस्थिती गरीब असून, आपण पैसे देऊ शकत नाही. त्यावेळेस सुनील माने याने त्याच्या दिशेने तलवारीचा वार केला. त्याने तो चुकवला. त्यानंतर विनोद माने यांनी त्याला काठीने मारहाण केली.
सुनील माने याने त्याच्या गळ्यावर पाय दिला. त्यानंतर आणखी दोन इसमांनी त्याला पकडले. त्यावेळेस त्याच्या खिशातून १३ हजार रुपये काढून घेतल्याचे त्याने फिर्यादीत सांगितले. फिर्यादी हा अत्यंत भयभीत झालेला होता. त्यांच्या सांगण्याप्रमाणे फिर्याद नोंदवून सदरचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांच्याकडे देण्यात आला.
वरील दोन्ही आरोपींना तात्काळ गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.