ताडोबात पर्यटकांच्या संख्येत घट; नेमकं कारण काय?
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात मागील काही वर्षांत वाघांची संख्या वाढल्याने हा प्रकल्प जागतिक पातळीवर चर्चेत आहे. स्थानिकांसह विदेशी पर्यटक येथे सहलीला सहकुटुंब व मित्रांसह येत असल्याने ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प व्याघ्र पर्यटनात पुन्हा एकदा अव्वल ठरला आहे. नुकत्याच झालेल्या प्राणी जनगणेत या प्रकल्पात 63 वाघ आढळून आल्याने व्याघ्र दर्शनाच्या अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. असे असले तरी तुलनात्मक ताडोबात पर्यटकांची संख्या घटली आहे.
महसुलात मात्र दीड पटीने वाढ झाली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षभरात 4 लाख 5 हजार पर्यटकांनी हजेरी लावलेली आहे. तर 2024-25 या आर्थिक वर्षात 3 लाख 67 हजार पर्यटकांनी हजेरी लावली हे विशेष. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा भारतातील सर्वोत्तम प्रकल्पांपैकी एक आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान आहे. परिणामी या व्याघ्र प्रकल्पाला येणाऱ्या व्याघ्रप्रेमींची संख्या मोठी आहे. ताडोबात मागील आर्थिक वर्षभरात बफर व कोर क्षेत्रात मिळून 3 लाख 67 हजार 4 पर्यटकांनी हजेरी लावलेली आहे. त्यात कोर झोन मधील 1 लाख 16 हजार 350, तर बफर झोन मधील 2 लाख 50 हजार 654 पर्यटकांचा समावेश आहे.
2023-24 मध्ये याच प्रकल्पात 4 लाख 5 हजार 888 पर्यटकांनी हजेरी लावलेली होती हे विशेष. तेव्हा ही आजवरची सर्वात मोठी पर्यटन संख्या ठरली होती. यातून यंदा प्रकल्पाला सर्वाधिक एकूण 14 कोटी 20 लाख 33 हजार 913 रुपयांचा महसूल मिळाला होता. पण यंदा 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या वर्षात प्रकल्पाला सर्वाधिक एकूण 36 कोटी 72 लाख 8 हजार 780 रुपयांचा महसूल मिळाला आहे. सप्टेंबर 2023 ते मार्च 2025 या कालावधीत कोर क्षेत्रात 11 हजार 874, तर बफर क्षेत्रात 11 हजार 228 विदेशी पर्यटकांनी भेट दिली असल्याचे समोर आले आहे. दरम्यान या उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मार्चपासून मॉन्सूनच्या आगमनापर्यंत पर्यटकांची गर्दी प्रकल्पात कायमच आहे.
कोणत्या वर्षी किती पर्यटक
वर्ष
– पर्यटन संख्या
2021-22 – 1 लाख 97 हजार 584
2022-23 – 3 लाख 19 हजार 668
2023-24 -4 लाख 5 हजार 888
2024-25 – 3 लाख 67 हजार 4