चार पदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते
नागपूरमध्ये रोजगार निर्माण होणार
अमरावती मार्गावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण
नागपूर: ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार हे महाराष्ट्राला पडलेले एक सुंदर स्वप्न होते. आपले ज्ञान त्यांनी स्वत:पुरते सीमित न ठेवता प्रत्येक व्यक्तीला त्यांनी वाटले. व्यापक दूरदृष्टी असलेले ते भविष्यवेत्ता होते. काळाच्या पूढे जाऊन वाचणारे जे योगी असतात त्यांच्यापैकी ते एक होते. त्यांचे आर्थिक, सामाजिक, विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रातील चिंतन हे महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरले, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्ञानयोगी स्व. डॉ. श्रीकांत जिचकार यांचे स्मरण केले. अमरावती मार्गावरील बहुप्रतिक्षीत असलेल्या या उड्डाणपुलाच्या लोकार्पण समारंभात ते बोलत होते.
नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर बोले पेट्रोल पंचचौक ते नागपूर विद्यापीठ परिसर चौकापर्यंत असलेल्या चार पदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, विधानपरिषद सदस्य सर्वश्री डॉ. परिणय फुके, संदीप जोशी, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, चरणसिंग ठाकूर, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी खासदार विकास महात्मे, श्रीमती राजश्री श्रीकांत जिचकार व मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कधी काळी विदर्भातील समग्र विकासाबद्दल कटिबद्धता असूनही अनेक उद्योजक पायाभूत सुविधा समाधानकारक नसल्याने येथे आपले उद्योगविश्व साकारण्यास उत्सूक नव्हते. याबाबत आम्ही प्राधान्याने विचार करुन सर्व शक्तीनिशी कटिबद्ध होऊन यावर भर दिला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या इप्न्फ्रास्ट्रक्चर क्षेत्राला आकार देत नागपूर महानगराचा कायापालट करुन दाखविला. आज नागपूरमध्ये देश विदेशातील जे शिष्टमंडळ भेटीला येतात. ते येथील पायाभूत सुविधा पाहून आवाक होत विविध करारासाठी, उद्योग विश्वासाठी विश्वासाने पुढे येत असल्याचे गौरोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
येथील शैक्षणिक सुविधा असो, औद्योगिक विश्वाची पायाभरणी असो, नवतंत्रज्ञान असो, येथील शेती, संत्रा प्रक्रिया उद्योग, खनिज उद्योग या सर्व क्षेत्राला घेऊन आम्ही समतोल विकासासाठी प्रयत्नरत आहोत. या प्रयत्नांना आता यश येत असून भारतातील सर्वात जास्त सोलर मॉड्युल निर्मिती उत्पादन क्षमता असलेले महानगर म्हणून नागपूर ओळखले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. सोलर मॉड्युल निर्मितीचे एक हब स्वरुपात नागपुरमध्ये एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. पायाभूत परिपूर्ण सुविधांसह नागपूर आता उच्च तंत्रज्ञानातही आघाडीवर असलेले महानगर घडवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.