देवेंद्र फडणवीसांचे अनिल देशमुखांवर टीकास्त्र (फोटो- ट्विटर)
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण रंगले आहे. नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याने गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेमुळे मला कधीही अटक होऊ शकते असा मोठा दावा शरद पवार गटाचे नेते व आमदार अनिल देशमुख यांनी केला आहे. गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या प्रकरणात सीबीआयने अनिल देशमुखांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपांना फडणवीसांनी उत्तर दिले आहे.
अनिल देशमुखांनी फडणवीसांच्या कृपेने मला कधीही अटक होऊ शकते असे ट्विट केले होते. त्या आरोपांवर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”हा केवळ सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. याला दुसरे काही म्हणता येणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर हे प्रकरण आम्ही सीबीआयकडे दिले. त्या केसमध्ये एसपी दर्जाच्या अधिकाऱ्याने जबाब दिला आहे की, अनिल देशमुखांनी माझ्यावर दबाव टाकला. गिरीश महाजनांना आरोपी करून त्यांच्यावर मोक्का लावण्याचा प्रयत्न केला. गिरीश महाजनांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला. याबद्दलचे सगळे पुरावे एसपी दर्जाच्या अधिकाऱ्याने दिलेले आहेत. त्याबद्दलच्या नोंदी देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सीबीआयने ही कारवाई केलेली आहे. कोणतीही चूक नसताना गिरीश महाजनांना जीवनातून उठवण्याचा प्रयत्न जो त्यांनी केला, त्याबद्दल त्यांनी गिरीश महाजनांची माफी मागितली पाहिजे.”
🕟 4.27pm | 10-9-2024📍Nagpur.
LIVE | Media interaction#Maharashtra #Nagpur https://t.co/WzwUt1nTgF
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 10, 2024
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ दिवसेंदिवस वाढ होत आहे. राजकीय नेत्यांची अडवणूक केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली होती. भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस अधिक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आला आहे. यावरुनच सीबीआयकडून देशमुख यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पोस्ट करुन अनिल देशमुख यांनी त्यांच्या मनातील भीती व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.
हेही वाचा: माझी आणि अनिल देशमुखांची नार्को टेस्ट करा; ‘या’ प्रकरणात गिरीश महाजनांचे खुले आव्हान
गिरीश महाजन काय म्हणाले?
गिरीश महाजन यांनी अनिल देशमुखांना समोरासमोर चर्चा करण्यासाठी यावे. तसेच माझी आणि अनिल देशमुख यांची नार्को टेस्ट करावी. म्हणजे खरे कोण बोलत आहे हे कळले असे खुले आव्हान महाजनांनी देशमुखांना दिले आहे. वारंवार खोटे आरोप करून अनिल देशमुख स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महाजनांनी केला आहे.