पुरामुळे 112 गावे तब्बल 2 महिने असतात संपर्काबाहेर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज
गडचिरोली. एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा वाढला असतानाच संपूर्ण मे महिना लागताच अवकाळी पावसाने थैमान घातले. ते संपूर्ण महिनाभर राहिले. त्यामुळे यावर्षी पाहिजे त्या प्रमाणात नागरिकांना उन्हाची दाहकता जाणवली नाही. त्यातच यावर्षी मान्सून नियोजित वेळेच्या 12 दिवसांपूर्वीच राज्यात दाखल झाला. गडचिरोली जिल्ह्यात लहान-मोठ्या नदी नाल्यांच्या काठावरील 154 गावांना पुराचा धोका आहे तर 112 गावे 2 महिन्यांपेक्षा जास्त दिवस संपर्काबाहेर असतात. त्यासाठी अगोदरच नियोजन करण्यात आले असून, जिल्हा आपत्ती विभाग संपूर्ण पूरपरिस्थितीसाठी सज्ज झाले.
जिल्ह्यात राज्याच्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत अधिक पाऊस पडतो. जिल्ह्याची वार्षिक पर्जन्यमान सरासरी 1400 मिमीच्या आसपास आहे. जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीत हा पाऊस पडतो. जिल्ह्याच्या अहेरी उपविभागात लहान, लहान नाले असल्याने मुसळधार पावसात या नाल्यांना पूर येतो. अतिवृष्टी झाल्यास कित्येक गावांचा संपर्क केतुटतो. तुटतो अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या पूरबाधित गावांना वेळीच मदत पोहोचविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने नियोजन केले आहे. प्रत्येकगावातील तलाठी, ग्रामसेवक यांनी
पावसाळ्याच्या दिवसात अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यातील सर्वात मोठी नदी गोदावरी हीसुद्धा गडचिरोली जिल्ह्यातून जाते. या नदीच्या पुराचा फटका सिरोंचा तालुक्याला बसतो. तर इंद्रावती नदीच्या पुराचा फटका भामरागड व सिरोंचा तालुक्याला बसतो. वैनगंगा नदीच्या पुराचा फटका आरमोरी, देसाईगंज, गडचिरोली, चामोर्शी तालुक्याला बसतो. अनेक गावांपर्यंत जाण्यासाठी रस्ते नाहीत, उंच पूल नाहीत. त्यामुळे त्या भागातील अनेक गावांचा पहिल्याच पावसात संपर्क तुटतो. पुरात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी पट्टीच्या पोहणा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे मोबाइल नंबर प्रशासनाने घेऊन ठेवले आहेत. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्यांना कॉल करून वेळीच बोलाविले जाणार आहे. आकस्मिक स्थिती निर्माण झाल्यास पोलिस दलाचे हेलिकॉप्टरसुद्धा मदतीसाठी वापरले जाते. औषध, रेशनचा अगोदरच पुरवठाः जिल्ह्यात 154 पूरबाधित गावे आहेत. तर 112 गावे 2 महिन्यापेक्षा अधिक दिवस संपर्काबाहेर असतात.
जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाकडून प्रत्येक गावातील तरूण, तरुणींना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. अनेकदा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा संबंधित ठिकाणी पोहोचण्यास उशिर झाल्यास स्थानिक आपदा मित्र त्याठिकाणच्या आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज असतात. जिल्ह्यात जवळपास 299 आपदा मित्र असून, ते जिल्हा आपत्ती विभाग व एसडीआरएफ टीमला सहकार्य करीत असतात. प्रशासनाकडून औषधी, रेशन पोहोचवण्यात आले आहे. जेणेकरून त्यांना पावसाळ्यात कोणतीही अडचण जाणार नाही. 2022 च्या कृत्रिम पुरामुळे 67 गावे बाधित झाली होती.
आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. आवश्यक प्रशिक्षण सर्वांना देण्यात आले आहे. शोध व बचाव पथक सर्व साधनांसह सज्ज आहे. प्रशिक्षित पुरेसे मुनष्यबळ तयार आहे. – नीलेश तेलतुंबडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, गडचिरोली
जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी एसडीआरएफची टीम सज्ज आहे. या टीममध्ये एकूण 34 जवान व 4 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आपत्तीचा सामना करण्यासाठी पुरेशा मनुष्यबळासह मोटरबोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, रोप बंडल, सर्च लाईट, मेगा फोन, ऑक्सिजन किट आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.