नांदेड विमानतळावर सेवांना अनिश्चित काळासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला (संग्रहित फोटो)
नांदेड : महाराष्ट्रात सध्या अनेक विमानतळ आहेत. या विमानतळावरून अनेक विमानांची उड्डाणं होत असतात. पण, आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने नांदेड विमानतळावर सेवांना अनिश्चित काळासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या एक-दोन दिवसांपासून येथे विमानसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.
जिल्ह्यावर नुकत्याच ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या जखमा अजूनही भरून न आल्याच असताना नांदेडकरांवर आणखी एक मोठा आघात ओढवला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने नांदेड विमानतळावर सेवांना अनिश्चित काळासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतल्याने शुक्रवारीपासून येथे विमानसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्याच्या विकासस्वप्नांना तात्पुरता ब्रेक लागला असून प्रवाशांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
नांदेड विमानतळावर धावपट्टीची अवस्था धोकादायक पातळीपर्यंत पोहोचल्याच्या कारणावरून विमान महासंचालयाने ही कारवाई केली. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या पत्रावरून तातडीने आदेश जारी झाले. परिणामी शक्रवारी सकाळी नांदेडहून दिल्लीजवळच्या आदमपूरकडे जाणारे विमान थांबविण्यात आले. आधीच आरक्षण केलेले प्रवासी विमानतळावर पोहोचले असतानाच ही धक्कादायक माहिती त्यांना मिळाली.
पर्यटनाच्या संधींसाठी हवाई सेवा आवश्यक
नांदेडसारख्या सीमाभागातील जिल्ह्याला उद्योग, गुंतवणूक आणि पर्यटनाच्या संधींसाठी हवाई सेवा आवश्यक आहे. पण विमानतळाच्या देखभालीकडे कायमच अनास्थेने पाहिले गेले. राज्य सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्क्रयतेमुळे विमानतळ बंद होण्याची वेळ आहे. यामुळे प्रवाशांत नाराजी व्यक्त होत आहे
मराठवाड्याच्या प्रगतीला मिळाली असती गती
मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरू, हैदराबाद यासारख्या प्रमुख शहरांशी नांदेडला जोडणाऱ्या सेवा सुरू झाल्याने मराठवाड्याच्या प्रगतीला गती मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे भाडेतत्त्वावर संचालन दिल्यानंतर ही कंपनी दिवाळखोरीत गेली. नंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ताबा घेऊन एका कंपनीला दिला.
पुढील वाटचाल अनिश्चित
सध्या स्टार एअरलाइन्स दिल्ली, बंगळुरू, पुणे, हैदराबाद अशी उडान अंतर्गत सेवा सुरू होती. या सेवांचे थांबणे म्हणजे नांदेडकरांच्या पायाखालची वाळू सरकल्यासारखी परिस्थिती झाली आहे. व्यापारी, विद्यार्थी, रुग्ण तसेच नोकरदार वर्गाला प्रचंड फटका बसला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विमानतळ बंदीबाबत मुख्यमंत्री आणि शासनाशी संपर्क साधला असल्याचे सांगितले.