नांदेडमध्ये गुन्ह्याच्या घटना आणि गॅंगवॉर वाढल्यामुळे पालकमंत्री अतुल सावे यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले (फोटो - सोशल मीडिया)
Nanded Crime News : नांदेड : नांदेड शहर सध्या गंभीर कायदा व सुव्यवस्था समस्येला सामोरे जात असून अवघ्या ७२ तासांत पाच जणांच्या हत्यांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे शहरातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. मात्र या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांची अनुपस्थिती नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. (Crime News)
शहरात गैंगवारसदृश घटना, गोळीबार आणि वाढते गुन्हेगारी प्रमाण पाहता प्रशासनावर ताण वाढलेला दिसतो. अशा वेळी पालकमंत्र्यांनी तातडीने भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, पोलीस यंत्रणेला स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र अद्याप त्यांच्या भेटीचा किंवा ठोस प्रतिक्रियेचा अभाव जाणवत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. नांदेड हे राज्यातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र मानले जाते. दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. परंतु सध्याच्या घटनांमुळे सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाले असून पालकांमध्येही चिंता वाढली आहे. दरम्यान, गुन्हेगारांचे वाढते धाडस, तडीपार व सराईत आरोपींची पुन्हा सक्रियता यामुळे पोलीस यंत्रणेपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. एका घटनेचा तपास सुरू असतानाच दुसरी घटना घडत असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी समन्वयित व कडक कारवाईची गरज व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांचा प्रश्न कायम आहे ‘पालकमंत्री नेमके कुठे आहेत?’ परिस्थितीवर त्वरित नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी सक्रिय भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा नांदेडकरांकडून व्यक्त होत आहे.
हे देखील वाचा : नागपूर RSS मुख्यालयाजवळ जिलेटिनच्या कांड्या आणि डेटोनेटर सापडले; शहरात हाय अलर्ट
नांदेड शहरात सुरू असलेल्या रक्तरंजित गैंगवारने पुन्हा एकदा थरकाप उडवला असून, शिवसेना कार्यकर्ते सोनू कल्याणकर यांची सोमवारी पहाटे निघृण हत्या करण्यात आली. सलग दोन दिवसांत घडलेली ही पाचवी खुनाची घटना असून, शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचे चित्र समोर येत आहे. श्रीनगर रस्त्यावरील पंचशील कापड दुकानाजवळ असलेल्या कुमार ड्रेसेस समोर ही थरारक घटना घडली. सोमवारी पहाटे अचानक एका अज्ञात चारचाकी वाहनातून सहा ते सात हल्लेखोर बाहेर पडले. त्यांच्या हातात तलवारी, लोखंडी रॉड आणि धारदार शस्खे होती. त्यांनी\ कोणतीही उसंत न देता सोनू कल्याणकर यांच्यावर झडप घालत बेदम वार केले. मानेवर, पाठीवर आणि संपूर्ण शरीरावर सपासप वार करता त्यांच्या शरीराची अक्षरशः चाळण करण्यात आली. हा हल्ला इतका भीषण होता की, सोनू कल्याणकर यांचा जागीचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून तात्काळ पलायन केले. सकाळी ट्युशनसाठी जाणाऱ्या विद्याध्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली, तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सोनू कल्याणकर यांनी काही वर्षांपूर्वी भाजयुमो अध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली होती.
हे देखील वाचा :“सुनेत्रा पवारांना महाविकास आघाडीकडून अधिकृत पाठिंबा नाही पण..; खासदार संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं






