खासदार संजय राऊत पत्रकार परिषद घेऊन बारामती पोटनिवडणुकीवर भाष्य केले (फोटो - सोशल मीडिया)
Maharashtra Politics : मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक (Baramati by election) जाहीर झाली आहे. मात्र यावरुन राज्यामध्ये जोरदार राजकारण तापले आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा केली जात होती. शरद पवार गटाने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. मात्र काँग्रेस पक्ष उमेदवार जाहीर करत निवडणुकीच्या रिंगणात उतरला. यामुळे जोरदार वादंग निर्माण झाला आहे. यावर खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) प्रतिक्रिया दिली.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला.त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. त्यांनी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने उमेदवार दिल्याने प्रतिक्रिया दिली. खासदार संजय राऊत म्हणाले की, ” मी शरद पवार यांच्या मताशी सहमत आहे. त्यांनी आयुष्यभर काँग्रेससोबत काम केले असून त्यांची विचारधारा काँग्रेसचीच आहे. त्यामुळे काँग्रेसला ही जागा लढण्याचा अधिकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कौटुंबिक कारणांमुळे निवडणूक लढवत नाही, याचा अर्थ इतरांनी लढू नये असा होत नाही. लोकशाहीत कोणालाही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. अजित पवार यांनीही पिंपरी-चिंचवड पोटनिवडणूक काँग्रेसच्या मदतीने लढवली होती, हा अलीकडचा इतिहास आहे,” असे उदाहरण खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.
हे देखील वाचा : कृतघ्न मुलगा अन् कुटुंबाच्या पूर्वपुण्याईवर खासदार; काँग्रसेनी पार्थ पवारांना धरलं धारेवर
पुढे संजय राऊत म्हणाले की, “सुनेत्रा पवार यांना महाविकास आघाडीकडून अधिकृत पाठिंबा नाही. मात्र सद्भावना आहेत. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर हे स्पष्ट झाले. बारामतीची निवडणूक शांततेत पार पडेल. मतदार आपली भूमिका मतपेटीतून मांडतील. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सध्या निवडणुकीपासून दूर आहेत. पण काँग्रेस हा महाविकास आघाडीचा घटक असल्याने त्यांनी उमेदवार दिला आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
हे देखील वाचा : राष्ट्रवादीत जय पवारांची मोठी एन्ट्री! अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांची मास्टरस्ट्रोक रणनीती
मुंबईतील संयुक्त महाराष्ट्राच्या दालनाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. यावर खासदार राऊतांनी रोष व्यक्त केला. ते म्हणाले की, “राजकारण तर आहेच. पण ज्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमुळे आपण राजकारण करत आहोत, त्या संयुक्त महाराष्ट्र दालनाची स्थिती काय आहे आणि त्यासाठी कोण जबाबदार आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त शिवतीर्थावर संयुक्त महाराष्ट्र दालन उभारण्यात आले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास आणि संघर्षगाथा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी दालनाची निर्मिती झाली. साडेचार वर्षांच्या प्रशासनात, भाजपच्या नेतृत्वाखालील काळात हे दालन पूर्णपणे दुर्लक्षित झाले. दालनाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. आतील बहुमोल कलाकृती नष्ट झाल्या, वाळवी लागली, भिंतींना भेगा पडल्या, छत तुटले. तरीही प्रशासनाने किंवा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली नाही. हे १०६ हुतात्म्यांचे दुर्दैव आहे,” अशी शोकांतिका खासदार संजय राऊत यांनी मांडली.






