नाशिक – इंस्टाग्राम या सोशल मीडियावर रिल्स काढून पोस्ट करणे ही तरुणाईची आवड बनली आहे. मात्र या रिल्समध्ये धारदार शस्त्रे दाखवणे बेकायदेशीर आहे. नाशिकमधील दोन तरुणांना ही चूक महागात पडली आहे. नाशिकमधील सिन्नर मधील दोन तरुणांनी तलवार दाखवत रिल्स काढले. यामुळे नाशिकच्या ग्रामीण पोलिसांनी रिल्स काढलेल्या आणि त्यांना तलवारी पुरवलेल्या व्यक्तीवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
पल्सर मोटरसायकल वर बसून हातात असलेली तलवार हवेत फिरवताना व्हिडिओ रिल बनवून हा व्हिडिओ इंस्टाग्राम या सोशल वेबसाईटवर शेअर केला. इंस्टावर तो व्हिडिओ 1—Dhiraj—2 या अकाउंट द्वारे अपलोड करण्यात आला होता. या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्याकडे अज्ञात व्यक्तीने माहिती दिली होती.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंस्टाग्रामवरील या रील ची पडताळणी केली. सदर रील बनवणारे व अपलोड करणारे यांचे वर्णन घेऊन गुन्हे शाखेचे पथक सिन्नर मध्ये या तरुणांचा शोध घेत होते. सातपीर गल्ली परीसरात ते दोघे मिळुन आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता रुषिकेश राजेंद्र बोरसे, वय-२४ रा वावीवेस सिन्नर व धिरज बाळु बर्डे, वय-२१ वर्षे रा सातपीर गल्ली, सिन्नर अशी त्यांची ओळख पोलिसांनी पटली.
तलवार पुरवणाऱ्यांना अटक
पोलिसांनी अटक केलेल्या तरुणांना रिल्स मध्ये वापरण्यात आलेल्या तलवारींबाबत चौकशी केली. त्यांनी सिन्नर शहरातील ढोके नगर भागात राहनारा गुरुनाथ भागवत हळकुंडे याच्याकडून घेतली असल्याचे कबुल केले. गुरुनाथ हळकुंडे यास हॉटेल शाहू परिसरातून पोलीस पथकाने ताब्यात घेतले. तलवारींबाबत विचारले असता त्याने दोन तलवारी पंजाब अमृतसर येथून विकत आणल्या असल्याची कबुली दिली. मनेगाव रोड येथील गाईच्या गोठ्यात या तलवारी लपून ठेवल्याचे त्यांनी सांगितले. पंच्यांच्या समक्ष या तलवारी पोलिसांनी गोठ्यातून जप्त करण्यात आल्या आहेत.