एसटीचे अकरा अधिकारी निलंबित; कामात हलगर्जीपणा केल्याने एसटी प्रशासनाची कारवाई
नाशिक : एसटी महामंडळाने स्थापन केलेल्या नियोजन समितीच्या तपासणीत कामकाजात हलगर्जीपणा आणि त्रुटी आढळल्या. त्यामुळे, एसटीच्या विभागीय कार्यालयातील तब्बल अकरा अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये दर्जा एकचे ३, तर दर्जा दोनच्या आठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे एसटीच्या वर्तुळात खळबळ उडाली.
गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला नफ्यात आणण्यासाठी, तसेच उत्पन्न वाढवून खर्च कमी करण्यासाठी ‘नियोजन समिती’ची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे सदस्य, नियोजन अधिकारी आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या महाव्यवस्थापकांनी १० जून रोजी नाशिक विभागीय कार्यालय, तसेच इगतपुरी आणि पंचवटी डेपोची अचानक तपासणी केली होती. या तपासणीत अनेक विभागांच्या कामकाजात गंभीर त्रुटी आणि निष्काळजीपणा आढळून आला. समितीने सादर केलेल्या या गोपनीय अहवालाच्या आधारे महामंडळाने अखेर ही मोठी कारवाई केली.
कोणावर झाली निलंबनाची कारवाई?
श्रावण सोनवणे (प्रादेशिक अभियंता), सचिन क्षीरसागर (विभाग नियंत्रक), पंकज महाजन (यंत्र अभियंता), किरण भोसले (वाहतूक अधिकारी), सौरभ देवरे (वरिष्ठ आगार व्यवस्थापक, पंचवटी), नीलिमा विसपुते (लेखाधिकारी), संजय गायधनी (विभागीय लेखाधिकारी), अमोल वाघ (विभागीय भंडार अधिकारी), अश्विनी चव्हाण (विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी), चैताली भुसारे (विभागीय अभियंता), प्रणव अहिरे (आगार व्यवस्थापक, इगतपुरी)
कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार?
निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये विभागातील जवळपास सर्वच मुख्य विभागांच्या प्रमुखांचा समावेश आहे. त्यामुळे विभागाचे दैनंदिन कामकाज पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच आठवड्यात कर्मचाऱ्यांचे पगार होणार असल्याने, या कारवाईमुळे पगार वेळेवर होणार की रखडणार? असा प्रश्न कामगारांमधून उपस्थित केला जात आहे. तसेच डिझेल पुरवठा आणि बसेसच्या दुरुस्तीवरही याचा मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
काय आहे समितीच्या अहवालात?
समितीने दिलेल्या अहवालात चालक-वाहक व वाहनांच्या योग्य वापराबाबत नियोजनाचा अभाव, अभिलेख (रेकॉर्ड) न ठेवणे वा अर्धवट ठेवणे, दिशाभूल करणाऱ्या नोंदी, नुकसानीस प्रतिबंध करण्याकडे दुर्लक्ष, गैरवर्तन व गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई न करणे आणि प्रवाशांची गैरसोय करणे अशा कृतीमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाल्याचा ठपका समितीने ठेवला आहे.
इगतपुरी, नाशिक आगाराचे काम निष्काळजीपणाचे
इगतपुरी बसस्थानक आणि नाशिक दोन आगाराच्या तपासणीदरम्यान नाशिक विभागाचे कामकाज हे अत्यंत निष्काळजीपणे व बेफिकीर वृत्तीने सुरू आहे. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांची गंभीर दखल न घेता अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याकडे अहवालातून लक्ष वेधण्यात आले. पाहणी दरम्यान समोर आलेल्या बाबींवरून या अधिकाऱ्यांची गैरशिस्त, कामचुकारपणा, हलगर्जीपणावर बोट ठेवण्यात आले.






