धक्कादायक! अशोक खरातच्या फार्म हाऊसवर जिल्हा परिषदेची उधळपट्टी, शासकीय राजवटीत 'मुक्त उधळण'
नाशिक: स्वयंघोषीत भोंदू अशोक खरात याच्या सिन्नर तालुक्यातील मीरगाव येथील इशान्येश्वर मंदिराला बेकायदेशीर तिर्थक्षेत्राचा दर्जा देवून राज्याच्या पर्यटन मंत्रालयाने कोट्यवधी रूपये खर्च केल्याने खरातच्या राजकीय कनेक्शनची चर्चा होत असतांनाच आता नाशिक जिल्हा परिषदेने देखील प्रशासकीय राजवटीत खरातच्या मीरगावच्या फार्महाऊससाठी कोट्यवधीची उधळण केल्याची माहिती समोर येत आहे. खरातवर करण्यात आलेल्या शासकीय खैरातीचे कारण समजू शकले नसले तरी, एका महिला अधिकाऱ्याने या माध्यमातून दिलेली गुरूदक्षिणा मानली जात आहे. संपूर्ण राज्यातच खरातच्या राजकीय व शासकीय कनेक्शनविषयी उलट-सुलट चर्चा व संभ्रमीत करणारी माहिती दिवसेंदिवस उघड होत असत्तांना राजकीय कनेक्शनमध्ये राज्यस्तरीय राजकारण्यांचा समावेश असला तरी, शासकीय पातळीवर मात्र नाशिकमध्ये कार्यरत व बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांची अनेक नावे समोर येत आहेत. विशेषतः महिला आयएएस अधिकाऱ्याविषयी प्रचंड उत्सूकता निर्माण झालेली असतांना अशावेळी खरातवर जल्हा परिषदेने प्रशासकीय काळात केलेल्या उधळपट्टीच्या चर्चेने आता वेग घेतला आहे.
२०२२-२३ मध्ये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग एकच्या माध्यमातून सिन्नर तालुक्यातील मीरगावच्या विकासासाठी एक कोटीहून अधिक रक्कमेची तरतूद करून त्याआधारे खरातच्या फार्महाऊसच्या रस्त्यांची व तत्सम कामे करण्यात आल्याचे आता अधिकारीच सांगू लागले आहेत. खरातवर करण्यात आलेल्या या मेहेरबानीमागे देखील अनेक कारणांची चर्चा होऊ लागली असून, खातेप्रमुखानेच खरातचे शिष्यत्व पत्करल्यामुळे जिल्हा परिषदेची सिन्नर तालुक्यातील कामेच खरातच्या फार्महाऊसवरून चालविली जात असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित खाते प्रमुख महिला अधिकाऱ्याचे आठवड्यातील तीन दौरे सिन्नरच्या आढाव्या बैठकीसाठी राखीव ठेवले जात एवढेच नव्हे तर सुरूवातील जि.प.तील अन्य खातेप्रमुखांनाही अशा बैठकीसाठी पाचारण केले जात असतांना नंतर मात्र फक्त महिला अधिकारीच अशा प्रकारच्या बैठका घेवून अन्य खातेप्रमुखांना सिन्नरपासून दूर ठेवत असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे शासकीय बैठकीसाठी एका बाजुने शासकीय वाहन तर परतीच्या प्रवासासाठी खासगी वाहनाचा वापर या अधिकाऱ्याकडून केला जात असल्याने त्याविषयी तेव्हा घेतल्या जात असलेल्या शंका आता खऱ्या ठरू लागल्याचे दावे केले जात आहे.
आयएएस दर्जाचे अधिकारी असतांना एकट्यानेच प्रवास करणे, चालक व अंगरक्षकाला दौऱ्यापासून दूर ठेवण्यात भलेही वैयक्तिक कारण असले तरी, त्यासाठीच्या संशयास्पद हालचालीची देखील आता चर्चा केली जात असून, आठवड्यातून दोन ते तीन वेळा सिन्नरमार्गे शिर्डी विमानतळावर जाण्याचे निमित शोधणे व खासगी वाहनाचा वापर करून दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी परतण्यामागे खरोखरच शासकीय कारणे होती काय असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. मीरगावच्या खरातशी असलेल्या संबंधातूनच पुढे ‘पास्ते’ येथे घेतलेल्या जमीनीचे सातबारेही आता काहींनी खंगाळण्यास सुरूवात केली आहे.






