वडगाव मावळमध्ये तुफान पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई देण्याची एनसीपीने मागणी केली (फोटो - सोशल मीडिया)
Monsoon News: वडगाव मावळ : राज्यामध्ये तुफान पावसाने हजेरी लावली आहे. परतीच्या पावसामुळे सर्वांचे हाल झाले आहेत. मात्र सर्वात जास्त नुकसान हे शेतकऱ्यांचे होत आहे. वडगाव मावळ परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे भात पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
तहसील कार्यालयात निवेदन सादर
या वेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मंत्री नारायण ठाकर, ज्येष्ठ नेते शांताराम लष्करी, सरपंच शिवाजी करवंदे, भिकाजी भागवत, मारुती असवले, किसन गवारी, भास्कर पिचड, बुधाजी पिचड, सदाशिव निसाळ, माजी सरपंच मारुती खामककर, बळीराम भोईरकर यांसह पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मे महिन्यातील असमयिक पावसामुळे यावर्षी भात पेरणी वेळेत होऊ शकली नाही. शेतकऱ्यांनी रोपे गोळा करून अडचणींवर मात करत काही प्रमाणात लागवड केली होती. मात्र, कापणीच्या टप्प्यावर असताना झालेल्या अवकाळी पावसामुळे भात पिके जमिनीत कोसळली, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आता उदरनिर्वाह आणि कर्जफेडीचे संकट निर्माण झाले असून, त्यांना शासनाने दिलासा देणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तातडीने पंचनामे आणि विमा भरपाईची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रशासनास विनंती केली आहे की, नुकसानग्रस्त भागातील सर्व शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, तसेच नुकसानभरपाई आणि पीकविमा योजनेअंतर्गत भरपाई रक्कम तत्काळ वितरित करण्यात यावी.
“शेतकऱ्यांना मदत करणे ही शासनाची जबाबदारी”
या वेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. नैसर्गिक आपत्तीसमोर तो नेहमीच असहाय होतो. म्हणूनच शासनाने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढील काही दिवस पावसाची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे सक्रिय झाल्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. मध्यपूर्व अरबी समुद्रावर सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हा पट्टा पुढील तीन ते चार दिवस उत्तर दिशेला सरकणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात किनारपट्टी लगतच्या भागासह इतर काही भागांमध्ये मोठा पाऊस होऊ शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्र किनारपट्टीजवळून प्रवास करणार असल्याने, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक असेल. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मात्र राज्यातील हवामान कोरडे होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.






