फोटो - टीम नवराष्ट्र
बारामती : राज्यामध्ये आषाढी वारीचा उत्साह दिसून येत आहे. अनेक राजकारणी देखील वारीमध्ये सहभागी होत आहे. अजित पवार य़ांनी देखील संत तुकाराम महाराज यांच्या पालखीमध्ये सहभाग घेतला. तसेच त्यांनी बारामती ते काटेवडी अशी पायी वारी केली. यावेळी त्यांनी वारकऱ्यांसोबत अंभग देखील म्हटले. तसेच टोक्यात टोपी व गळ्यात टाळ घेतलेले अजित पवार यांचे फोटो व्हायरल झाले. यावर जेष्ठ नेते शरद पवार यांनी टीका केली आहे. तसेच रशियन महिलेचा किस्सा देखील शरद पवार यांनी सांगितला आहे.
ज्वारीच्या दाण्यात पांडुरंगाचं दर्शन
शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना केंद्रातील मंत्रिपदावेळी घडलेला प्रसंग सांगितला. ते म्हणाले, प्रकाशसिंह बादल हे पंजाबचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी मी केंद्रीयमंत्री होतो. ते माझ्याकडे आले आणि मला पंजाबला यावं लागेल असं म्हणाले. कारण, नामदेव महाराजांचे स्मारक बांधण्यासाठी त्यांनी मला बोलावलं होतं. एखादा शीख व्यक्ती हे करतो, त्यांचा धर्म वेगळा तरी त्यांनी संतांचा विचार घेतला, असे शरद पवार यांनी सांगितले. आता रस्ते झाले आहेत, पण आधी नीटनीटके रस्तेही नव्हते. उजणी धरणाच्या उद्घाटनाला यशवंतराव चव्हाण आले होते. आम्ही चंद्रभागा इथे आडवतो आहे, त्यातून पीक उभं राहील आणि त्या ज्वारीच्या दाण्यात पांडुरंगाचं दर्शन होईल, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.
त्यांना हौशे नवशे गवसे म्हणतात
पुढे त्यांनी अजित पवार यांना टोला लगावताना रशियन महिलेचा प्रसंग सांगितला. शरद पवार म्हणाले, मी रशियात गेलो असताना तिथली एक महिला माझ्यासोबत मराठीत बोलत होती. त्यावेळी, मी वारी करते, असे मला त्या महिलेने सांगितलं. त्या वारीला पुण्यात आल्या तेव्हा मी त्यांना माझ्या घरी बोलावले होते. तेव्हा, तुम्ही वारी कुठून करता, असा प्रश्न पुण्यातील महिलेने त्यांना विचारला होता. त्यावर, ती रशियन महिला म्हणाली, वारी ही आळंदी ते पंढरपूर करायची असते. आधी-मधी जे वारी करतात, त्यांना हौशे नवशे गवसे म्हणतात, असे म्हणत शरद पवारांनी अजित पवारांच्या अर्ध्या वारीवरुन खोचक टोला लगावला.