पुणे : पुणे शहरातील ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) आयोजित कार्यक्रमामध्ये भाजप आमदार सुनील कांबळे (BJP MLA Sunil Kamble) यांच्या वर्तणुकीचा सर्वत्र निषेध केला जातो आहे. आमदार कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पदाधिकारी आणि एका पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याने त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी मत व्यक्त केले असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आवाहन केले आहे.
अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडत असलेल्या कार्यक्रमामध्ये भाजप आमदार कांबळे यांनी केलेल्या दादागिरीबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी मत मांडले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पुणेकरांना त्यांच्या संस्कृतीचा, भाषेचा तसेच सगळ्या गोष्टींचा सार्थ अभिमान आहे. प्रत्येक शहराची वेगळी संस्कृती व ओळख असते. ससून हॉस्पिटलच्या कार्यक्रमात सत्तेत असलेल्या जबाबदार व्यक्तीने पोलिसांना जी वागणूक दिली ते एका बेजबाबदार व्यक्तीलाही शोभत नाही. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. वर्दीला काही मान सन्मान आहे. पोलिसांसह दुसऱ्या पक्षातील माणसाला मारणं देखील चुकीचं आहे. राज्यातल्या पोलीस दलाचा मला अभिमान आहे” असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.
तसेच खासदार सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना देखील या प्रकरणाबद्दल आवाहन केले. त्या म्हणाल्या, “पुण्यात जी घटना घडली त्यांचा मी निषेध करते. भाजपसोबत आमचे मतभेद आहेत. मनभेद नाहीत. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मला आदर आहे. त्यांनी समोर येऊन बोलायला हवं होतं की माझ्या पोलिसांवर कोणी हात उचलला तरी मी सहन करणार नाही.”
पुढे त्या म्हणाल्या, “मिर्जापुर आणि पुण्यात काय फरक आहे, या सगळ्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना जाहीर पत्र लिहिणार आहे. तुम्ही जर कारवाई करणार नसाल तर कसं चालेल. तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाचं नाव घेता तर तुमच्या पक्षाला अगोदर ती संस्कृती शिकवा. आपण अशा घटना का सहन करायच्या” असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.