Maternal healthcare: राज्यात मातृ-बाल आरोग्यात मोठी प्रगती! राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून सकारात्मक चित्र समोर
सर्वेक्षणानुसार, गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यांत तपासणी करून घेणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढले आहे. तसेच बहुतांश महिलांनी किमान एकदा तरी प्रसूतीपूर्व आरोग्य तपासणी केली असून नियमित तपासणीचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे गर्भधारणेदरम्यान आई आणि बाळाच्या आरोग्यावर अधिक लक्ष देता येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
पोषणाच्या बाबतीतही सकारात्मक चित्र दिसून आले आहे. गर्भधारणेदरम्यान लोह-फॉलिक आम्लाच्या गोळ्यांचे सेवन करणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढले असून यामुळे रक्तक्षय कमी करण्यास मदत होत असल्याचे मानले जाते. नवजात बालकांना टिटॅनसपासून संरक्षण मिळण्याचे प्रमाणही वाढले आहे.
तसेच नोंदणीकृत गर्भधारणांमध्ये माता व बाल संरक्षण (एमसीपी) कार्ड मिळालेल्या महिलांचे प्रमाण अधिक असल्याने आरोग्य यंत्रणेचा महिलांशी संपर्क वाढल्याचे स्पष्ट होत आहे. सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार शहरी भागात काही निर्देशांक अधिक चांगले असले तरी ग्रामीण भागातही आरोग्य सेवांचा विस्तार होत असल्याचे दिसून आले आहे.
निर्देशांक – सर्वेक्षण-५ – सर्वेक्षण-६
पहिल्या तीन महिन्यांत प्रसूतीपूर्व तपासणी. – ७०.९% – ८५.४%
किमान एक प्रसूतीपूर्व आरोग्य तपासणी – ९१.६% – ९५.५%
किमान चार प्रसूतीपूर्व आरोग्य भेटी – ७१.४% – ७७.५%
१०० दिवस लोह-फॉलिक आम्ल गोळ्यांचे सेवन – ४८.२% – ७१.२%
१८० दिवस लोह-फॉलिक आम्ल गोळ्यांचे सेवन – ३०.९% – ५२.३%
माता व बाल संरक्षण (एमसीपी) कार्ड प्राप्त गर्भधारणा – ९५.५% – ९७.५%
‘मातृ आणि बाल आरोग्य क्षेत्रासाठी ही आकडेवारी सकारात्मक आहे. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात तपासणी करून घेणाऱ्या महिलांची संख्या वाढणे आणि नियमित प्रसूतीपूर्व भेटी होणे हे चांगले लक्षण आहे. लोह-फॉलिक आम्ल सेवनात झालेली वाढ मातांमधील रक्तक्षय कमी करण्यासाठी महत्त्वाची आहे. मात्र, प्रत्येक गर्भवती महिलेपर्यंत या सेवांचा दर्जेदार लाभ पोहोचण्यासाठी विशेषतः ग्रामीण भागात जागरूकता आणि फॉलोअप वाढविण्याची गरज आहे.’






