कर्जत/ संंतोष पेरणे : प्रशासनाची विकासकामं की अधोगतीची सुरुवात असा प्रश्न विचारण्याची वेळ कर्जतमधल्या शेतकऱ्यांवर आली आहे. तालुक्यातील माथेरान नेरळ कळंब या राज्यमार्ग 76 या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे.या रस्त्यावर साडे पाच मीटर रुंदीचा काँक्रीटचा रस्ता बनणार आहे.त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडे तोडली जाणार आहेत आणि या शक्यतेने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रस्त्याचे रुंदीकरण केले जात असताना रस्त्यासाठी कोणत्याही प्रकारे जमीन अधिग्रहीत करण्यात आलेली नसताना शेतकऱ्यांची पूर्व संमती न घेता रस्त्यावरील कामे सुरू असल्याने शेतकरी संतप्त झाला आहे.दरम्यान,रस्त्यावर आपल्या मालकीच्या जागेत खोदकाम करण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे,तर झाडे तोडण्यास विरोध करीत आहेत.
माथेरान नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ रेल्वे फाटक ते पोही फाटा या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण केले जात आहे.न व्याने या रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार असल्याने शेतकऱ्यांची जमीन देखील वापरली जाणार आहे. त्या जमिनीचे कोणतेही अधिग्रहण शासनाने केलेले नाही आणि त्यामुळे हे सर्व शेतकरी आपली जमीन देण्यास तयार नाहीत. म्हणूनच रस्त्याचे काम करताना आपला पूर्वीचा रस्ता आहे तेवढाच रस्ता नव्याने बनवण्यात यावा अशी मागणी करीत आहेत.मात्र शेतकऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दहिवली पासून बिरदोले पर्यंत अनेक ठिकाणी रस्त्याची कामे अडवली आहेत.हा रस्ता पूर्वी तयार करण्यात आला त्यावेळी रस्त्यासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने कोणत्याही प्रकारचा मोबदला दिलेला नव्हता.आता सरकार पुन्हा या रस्त्याचे रुंदीकरण करत असून त्यासाठी देखील येथील शेतकऱ्यांची जमीन वापरली जाणार आहे आणि त्या जमिनीचा मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी करीत रस्त्याचे काम अडवून ठेवले आहे.
हा रस्ता तयार केला जात असताना रस्त्याच्या आजुबाजूला असलेली झाडे तोडली जाणार आहेत आणि त्यामुळे शेतकरी आणखी संतापलेला आहे.शेतकऱ्यांचे आणखी नुकसान होणार असून त्या जमिनीमध्ये शेतकऱ्यांनी लावलेली झाडे देखील रस्त्यासाठी तोडली जाणार आहे.ती सर्व झाडे शेतकऱ्यांच्या आईवडिलांनी लावली असून वाढवली आहेत.झाडे तोडली जाणार हे मोठे दुःख या भागातील शेतकऱ्यांचे असणार आहे.रस्त्यासाठी झाडे तोडली जाणार असल्याने शेतकरी संतप्त आहे.त्यामुळं शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची मोजदाद करण्यासाठी आलेल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना निघून जाण्यास सांगितले.आधी रस्त्यासाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला द्या आणि नंतर रस्त्याचे काम करा अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. शेतकऱ्यांची कोणतीही झाडे तोडली जाऊ नये अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
आगरी समाज संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी
शेतकऱ्यांचा जमीन रस्त्यासाठी देण्यास विरोध असून रस्ता रुंदीकरण करू नये आणि झाडे तोडली जाऊ नये अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.मात्र तरी देखील शेतकऱ्यांवर अन्याय केल्यास शेतकऱ्यांची जी भूमिका असेल त्या भूमिके सोबत जात आमची कर्जत तालुका आगरी समाज संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.समाज संघटनेचे वतीने रस्त्याच्या दुतर्फा जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या सोबत या रस्त्याचे काम पाहणाऱ्या ठेकेदाराच्या कार्यालयात जाऊन आपल्या मागण्यांचे निवेदन बांधकाम खात्याचे उप अभियंता यांना दिले आहे.






