संग्रहित फोटो
संभाजीनगर : नांदेड व छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जिल्हा सामान्य रुग्णालयाची (General Hospital) झाडाझडती घेत तेथील सुविधा व असुविधांचा आढावा घेतला. तसेच उपस्थित डॉक्टर्स, सेवा देणाऱ्या नर्स आणि रुग्णांसोबत संवाद साधला.
शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे व महानगर प्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट देऊन तेथे उपलब्ध सुविधा तसेच असुविधा, रुग्णांना मिळणाऱ्या सेवा, साफसफाई, औषधींचा साठा आदींची माहिती घेत एक्स-रे मशीन आणि सिटीस्कॅन मशीनची पाहणी केली.
रुग्णांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा पुरविण्यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांसोबत चर्चा केली. सोबतच प्रत्येक वॉर्डाला भेट देऊन तेथील रुग्णांसोबत चर्चा करून सेवा देणारे डॉक्टर्स आणि नर्स सोबत संवाद साधला. काही आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे व महानगर प्रमुख पराग यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना चर्चे दरम्यान दिली. शिवसैनिक उपस्थित होते.
रुग्णालयातील साफसफाई, औषधींचा साठा याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सकांकडे करत रुग्णालयात वावरणाऱ्या आणि रुग्णांना त्रास देणाऱ्या दलालांचा बंदोबस्त करण्याची मागणी सुनील खराटे यांनी यावेळी केली.