वाई : येथील भाजी मंडईतील जुन्या घराला आणि लगतच्या दुकानांना आग लागून घर आणि दुकाने जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. येथील बाजारपेठेत व मध्यवस्तीत भाजी मंडईत असणाऱ्या सकुंडे यांच्या घराला व तीन दुकानांना दुपारी मोठी आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र घराच्या इमारतीचे, घरगुती साहित्याचे व दुकानांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आग लागल्याचे समजताच वाई पालिकेचे आग बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आग मोठी असल्याने व सोमवार आठवडा बाजार असल्याने नुकसान टाळण्यासाठी व आग इतरत्र पसरू नये म्हणून वाई पाचगणी महाबळेश्वर पालिका व किसन वीर साखर कारखान्याचा आग बंब आणि खाजगी टँकर बोलाविण्यात आले होते.चार तासांच्या अविरत प्रयत्नातून आग विझविण्यात आली.आठवडा बाजारातच आग लागल्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे आग विझविण्यात अडथळा येत होता.पोलीस निरीक्षक बाबासाहेब भरणे व उपनिरीक्षक सुधीर वाळुंज व इतर पोलीस कर्मचाऱ्यांना गर्दीला नियंत्रण करताना शिकस्त करावी लागली.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
पालिका अधिकारी व कर्मचारी,शहरातील युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आग आटोक्यात आणण्यास मदत केली.सायंकाळी घटनास्थळी आमदार मकरंद पाटील,तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी भेट दिली.त्यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या.