पाटस : दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे एका 36 वर्षीय युवकाला लोखंडी रॉडने मारहाण करुन गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चैन आणि 7 हजार रुपये लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गोपाळवाडी येथील चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
प्रणित राजेंद्र भागवत, सुरज राजु होले, रोहित महादेव होले, ओंकार नाना होले (सर्व रा. गोपाळवाडी, दौंड ता. दौंड जि. पुणे व इतर तिन अनोळखी व्यक्ती ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे असुन, शुक्रवारी (दि ३१) दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या आसपास कुरकुंभ येथील फिरंगाई क्रिकेट ग्राउंडवर हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरकुंभ येथील अविनाश श्रीरंग साळुंखे यांना प्रणित भागवत याने फिरंगाई क्रिकेट ग्राऊंड येथे बोलवुन काही कारण नसताना शिवीगाळ करून लोखंडी रॉडने डोक्यात व उजव्या खांद्यावर जबर मारहाण केली. या मारहाणीत सांळुखे यांना जबर दुखापत झाली आहे. तसेच गळ्यातील 60 हजार रुपये किंमतीची एक तोळ्याची चैन व खिश्यातील 7 हजार रुपये असा एकुण 67 हजार रुपयांचा ऐवज लुटून निघुन गेले. असे फिर्यादीत म्हटले आहे. साळुंखे यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने मारहाण करणे, चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास
सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड हे करीत आहेत.