कांदा आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली (फोटो - सोशल मीडिया)
नवापूर – नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्रीची बाजारपेठ सुरू करण्यात आली असून यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि वाहतूक खर्च वाचणार आहे. स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळावी, तसेच वाहतुकीवरील कर कमी व्हावा यासाठी बाजार समितीने हा निर्णय घेतला आहे.
नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने कांदा मार्केट सुरू केल्याने शेतकऱ्यांना आता कांदा विक्रीसाठी लांब अंतर पार करण्याची गरज भासणार नाही. यापूर्वी त्यांना लासलगाव, पुणे किंवा अन्य मोठ्या बाजारपेठांमध्ये जावे लागत होते, ज्यामुळे वेळ आणि पैसे दोन्ही खर्च होत होते. नवापूरमध्येच विक्री सुविधा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचा मालाला चांगला दर मिळेल. बाजारपेठ सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात कांदा लिलाव करण्यात आला. पहिल्याच दिवशी कांद्याला 1100 ते 1400 रु प्रति क्विंटल भाव बाजार समितीत कडून देण्यात आला. व्यापाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून स्थानिक पातळीवर अधिक चांगला दर मिळेल असे बाजार समिती कडून सांगण्यात आले आहे. नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा विक्री बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. यामुळे त्यांचा वेळ, श्रम आणि पैसा वाचणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. कांदा मार्केट सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मागील आठवड्यामध्ये कांदा केंद्र सरकारने कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.येत्या १ एप्रिल 2025 पासून या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरूवात होईल. या निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या दरामध्ये स्थिरता राखण्यासाठी 20% निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या धोरणामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. शेतकरी संघटनांनी वारंवार आंदोलन करून सरकारकडे शुल्क हटवण्याची मागणी केली होती.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अखेर, केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या सीमा शुल्क विभागाने निर्यात शुल्क हटवण्याची अधिकृत घोषणा केली आहे. हा निर्णय 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणा होण्याची अपेक्षा असून, शेतकऱ्यांचे लक्ष आता बाजारभावाकडे लागले आहे. विशेषतः लासलगाव बाजार समितीमध्ये सोमवारी कांद्याला मिळणाऱ्या दरावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे, कारण हा बाजार देशातील कांदा दर ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.