संग्रहित फोटो
पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सरईत गुन्हेगाराला सिंहगड रोड पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. या सराईताकडून एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. साहिल मार्तंड साखरे (वय २३, रा. दांगट चाळ, साई चौक, वडगाव बुद्रुक) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम भजनावळे, सहायक निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, गणेश झगडे, निलेश भोरडे, राहुल ओलेकर यांनी केली.
साहिलवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान सराईतांवर लक्ष ठेवण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सराईतांवर विशेष लक्ष देण्यात येते. दरम्यान, साहिल सिंहगड रो़ड परिसरात होता. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती गस्त घालणारे पोलीस कर्मचारी सागर शेडगे आणि देवा चव्हाण यांना मिळाली. या माहितीवरून पोलीस पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल सापडले. साखरे याच्याकडून पिस्तूलासह दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. साखरेने पिस्तूल कोणाकडून घेतले? कशासाठी पिस्तूल वापरत होता यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.