नागपूर : टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याच्या दरातही (Onion Prices) विक्रमी वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. सध्या नागपुरातील कळमना ठोक आलू-कांदे बाजारात दर्जानुसार ५० ते ६० रुपये आणि किरकोळमध्ये ८० रुपये किलो भाव आहे. केवळ आठवड्यातच २० रुपये किलोची वाढ झाली आहे. टोमॅटोनंतर आता कांद्याची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे.
नोव्हेंबरअखेरीस वा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवीन कांदे बाजारात आल्यानंतरच भाव कमी होण्याची शक्यता आहे. वाढीव दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण येणार आहे. मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा, हे’ मुख्य कारण समजले जात आहे. सध्या कळमना बाजारात दक्षिण भारतातून म्हणजे बेंगळुरू (कर्नाटक) आणि आंध्रप्रदेश राज्यातून कांद्याची आवक सुरू आहे. पूर्वी दररोज होणारी २५ ट्रकची आवक आता १० ट्रकपर्यंत (एक ट्रक १८ टन) कमी झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने काहीच दिवसात भाव वाढले आहेत.
ठोक बाजारात लाल कांदे दर्जानुसार ५० ते ६० रुपये आहेत. पुढे भाव स्थिर राहतील वा वाढतील, यावर आता भाष्य करणे कठीण आहे. भावपातळी केवळ पुरवठ्यावर अवलंबून राहील. सध्या कांदे दक्षिण भारतातून संपूर्ण भारतात विक्रीसाठी जात आहेत. त्यामुळेच सर्वच बाजारपेठांमध्ये कांद्याचा तुटवडा जाणवत आहे.