HSRP Plate : HSRP नंबर प्लेटची अंतिम मुदत 30 जून, तरीही आत्तापर्यंत 'इतक्या' लोकांनीच केलंय रजिस्ट्रेशन (फोटो सौजन्य-X)
मुंबई : दुचाकी आणि चारचाकी वाहनाला नवीन म्हणजे एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक असल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते. राज्य परिवहन विभागाने वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी यापूर्वी 31 मार्च 2025 ही तारीख दिली होती. त्यानंतर वेळोवेळी ही मुदत वाढवण्यात आली. असे असताना आता नवी मुदत 30 जून असूनही, राज्यात केवळ 25 टक्के वाहनांनाच एचएसआरपी नंबर प्लेट असल्याचे समोर आले आहे.
एचएसआरपी नंबर प्लेटसाठी अनेकदा मुदतवाढ देऊन नंतर 30 एप्रिलपर्यंत मुदत वाढवण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अद्याप 25 ते 30 टक्के गाड्यांचे नवीन नंबर प्लेट बसवल्या आहेत. राज्यात अनेक भागात अजूनपर्यंत नंबर प्लेट लावण्यासाठी केंद्र दिलेले नाही. तसेच ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी नागरिकांना, वाहनचालकांना याबाबतची माहिती नाही. त्यामुळे वाहनचालक नवीन नंबर प्लेट लावण्यात उदासीन आहेत.
दरम्यान, शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांच्या सुरक्षेविषयी अनेक गोष्टी डोळ्यांसमोर ठेऊन एचएसआरपी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बसवून घेण्याचा आदेश काढला होता. जुन्या वाहनांची संख्या पाहता या नंबर प्लेट बसवण्यासाठी एकदा मुदतवाढही दिलेली आहे. परंतु, वाहनधारक या आदेशाकडे दुर्लक्ष करत असून, नवी नंबर प्लेट बसवण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत नाहीत.
चोरीच्या किंवा पासिंग नसलेल्या गाड्यांवर होणार परिणाम
गाड्या चोरी करणारे लोक चोरीच्या गाड्या खोलून इंजिन एकाला तर चेसी दुसऱ्याला विकायची असा गोरख धंदा करत होते. परंतु, आता नवीन नंबर प्लेट साठी रजिस्ट्रेशन करताना गाडीचा इंजिन व चेसी नंबर टाकावा लागतो. तो मॅच होणे गरजेचे आहे. नंबर मॅच नाही झाला तर रजिस्ट्रेशन होत नाही.
फॅन्सी नंबर प्लेट्सना बसणार आळा
जे लोक चोरीची गाडी घेऊन नंबर बदलून किंवा नंबर न टाकता गाडी वापरत होते, ते आता नवीन नंबर प्लेटमुळे शक्य होणार नाही. एकसारख्या पॅटर्नमध्ये नंबर प्लेट बनत असल्यामुळे दादा, मामा, काका, भाऊ अशाप्रकारच्या नंबर प्लेट आता बनणार नाहीत.