आषाढी वारी (फोटो- सोशल मिडिया)
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे़. मंदिर समितीने भाविकांच्या सुलभ व जलद दर्शनाला प्राधान्य दिले आहे, यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत. दर्शन रांगेतील घुसखोरी, तात्काळ आरोग्य व्यवस्था, अनुचित प्रकार घडू नये व इतर घडामोडींवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. याशिवाय, नियंत्रण कक्षातून वॉकीटॉकीद्वारे संवाद साधून तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी सीसीटीव्हीची खूप मोठी मदत होत आहे.
याशिवाय, कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापक यांच्या कार्यालयात देखील या कॅमेऱ्यांचा अक्सेस दिला असल्याने त्यांना मुख्यालयात बसून सर्व घडामोडी पाहता येत आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे परीक्षण करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व श्री संत तुकाराम भवन येथे असे दोन नियंत्रण कक्ष (कंट्रोल रुम) तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये पूर्ण वेळ ऑपरेटरची नियुक्ती करण्यात आली असून, त्याची जबाबदारी विभाग प्रमुख राजेंद्र घागरे यांचेकडे आहे.
वारकरी भाविकांना केंद्रबिंदू मानून भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ज्या ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज होती, त्या त्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आयपी, अनॉलॉग व मेगापिक्सल नाईट व्हिजनचे अत्याधुनिक कॅमेरे आहेत. या सर्व कॅमेराद्वारे चित्रित केलेला डाटा देखील सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था निर्माण केलेली आहे. संबधित कॅमेरे सर्व दिशेस कव्हर करीत असल्याने कोणताही परिसर त्याच्या नजरेतून सुटत नाही. त्यामुळे भाविकांमध्ये सुरक्षितता निर्माण होणार असून, आवश्यक ठिकाणी भाविकांना तात्काळ मदत देखील करता येणार असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले.
चंद्रभागा स्नानासाठी सुरक्षेचे नियोजन सुरू, प्रशासन सज्ज
आषाढी शुद्ध एकादशीचा सोहळा दिनांक ६ जुलै २०२५ रोजी पार पडणार आहे. या सोहळ्यात चंद्रभागा नदीत स्नान करणे वारकऱ्यांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. यात्रा कालावधीत नदी पात्रात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. सध्या भीमा नदी पात्रात उजनी व वीर धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.वारकरी भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चंद्रभागा नदी पात्रातील पाण्याचा विसर्ग किती प्रमाणात झाला, त्यानंतर किती वाळवंट शिल्लक राहील याचा सविस्तर आराखडा तातडीने तयार करून सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या आहेत.