वाळूजमध्ये अवैध गॅस रिफिलिंगचा भांडाफोड (Photo Credit - X)
छत्रपती संभाजीनगर, वाळूज: वाळूज परिसरात घराच्या आडोशाने बेकायदेशीर गॅस रिफिलिंगचे दोन्ही मोठे अड्डे पोलिसांनी एका तासांच्या अंतराने धाड टाकून उद्धवस्त केले. मधुबन कॉलनी आणि साठेनगर या दोन्ही ठिकाणी मोठ्या कंपन्यांच्या गॅस टाक्यांचा साठा, बोगस पद्धतीने गॅस भरण्याची यंत्रणा, इलेट्रिक वजनकाटा व इतर साहित्य असा एकूण १ लाख १६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल वाळूज पोलिसांनी जप्त केला.
वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
गोविंद शेषराव भगत (३५, रा. मधुबन कॉलनी, कमळापूर रोड, वाळूज) आणि रसूल उर्फ फिरोज जहांगीर सय्यद (४२, रा. साठेनगर, वाळूज) अशी अवैध गॅस रिफिलिंग अड्डा चालविणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता, पोलिसांना माहिती मिळाली की, गोविंद भगत हा स्वतःच्या घरात मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर साठवून मशीनच्या साहाय्याने मोठ्या टाक्यांमधून छोट्या सिलेंडरमध्ये बेकायदेशीररीत्या गॅस भरून विक्री करत आहे.
एका दिवसात दोन ठिकाणी छापे
एका दिवसात आणि अगदी एका तासात पोलिसांनी सलग दोन कारवाया करत वाळूज परिसरातील बेकायदेशीर गॅस रिफिलिंगचे जाळे उद्धवस्त केले. रहिवासी भागात चालणाऱ्या या धोकादायक धंद्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे हा प्रकार उघडकीस आला.
फिरोज सय्यदचा बेकायदेशीर धंदा उघड
पहिली कारवाई संपताच अवघ्या ४५ मिनिटांत, म्हणजेच ११.४५ वाजता, वाळूज पोलिसांना आणखी साठेनगरमधील रमूल उर्फ फिरोज हा त्याच्या घरात बेकायदेशीर गॅस रिफिलिंगचा धंदा करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने साठेनगरात रमूल उर्फ फिरोज याच्या घरावर छापा मारला. घरझडतीत एचपी, भारत गॅस, इंडेनचे भरलेले व रिकामे सिलेंडर, लोकल कंपनीचे छोटे सिलेंडर, इलेवट्रिक वजनकाटा, गॅस पंपिंग मोटर व पाईप, रेग्युलेटर असा सुमारे १८ हजार ६५० रुपयांचा ऐवज मिळाला.
मधुबन कॉलनीतील अड्ड्यावर कारवाई
माहिती आधारे निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली मधुबन कॉलनी येथे छापा टाकून भगतला ताब्यात घेतले.
घराची झडती घेतली असता जिन्यात एचपी, भारत, इंडेन, गो गॅस तसेच लोकल कंपन्यांचे ५० हून अधिक भरलेले व रिकामे सिलेंडर, गॅस पंपिंग मशीन, इलेक्ट्रक वजनकाटा, अडॅप्टर, पाईप इत्यादी साहित्य असा सुमारे ९८ हजार ५० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई निरीक्षक पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय शितोळे, अंमलदार डंगरे, पिंपळे, धुळे, सपकाळ, कटारे, खाकरे यांच्या पथकाने केली.






