दिपक गायकवाड, मोखाडा: मोखाडा तालुक्यातील 28 ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या 42 रोजगार सेवकांना मागील पाच महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. डिसेंबर 2024 पासून आतापर्यंत सातत्याने मानधन न मिळाल्याने रोजगार सेवकांनी 5 ऑगस्ट 2025 पासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे नरेगा योजनेंतर्गत चालणारी सर्व रोहयो कामे ठप्प झाली आहेत आणि या परिस्थितीचा थेट परिणाम मजुर व त्यांच्या कुटुंबीयांवर होणार आहे.
रोजगार सेवक 2006 पासून नरेगाच्या माध्यमातून गावपातळीवर काम करत आहेत. शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, कामांची देखरेख, हजेरी नोंदवही, मोबाईल अॅपद्वारे माहिती अपलोड करणे ही सर्व कामे ते प्रामाणिकपणे करत असले तरी मानधन वेळेवर न मिळाल्याने त्यांच्या आयुष्यावर संकट ओढवले आहे. अनेक सेवकांनी सांगितले की, घर चालवण्यासाठी स्त्रियांचे दागिने गहाण ठेवावे लागले, तर काहींनी वाढते कर्ज आणि थकित हफ्त्यांमुळे मानसिक तणावाखाली जीवन जगण्याची वेळ आली आहे.
रोजगार सेवकांच्या मते, नोकरीच्या नावाखाली त्यांच्याकडून पूर्णवेळ काम करून घेण्यात येते, मात्र त्याला मिळणारे मोबदलेच न मिळाल्याने त्यांचा विश्वास शासनावरून उडालेला आहे. त्यांनी एकरकमी थकीत मानधन अदा करणे, प्रवास व अल्पोपहार भत्त्याचा दोन वर्षांचा थकबाकी रक्कम द्यावी, तसेच नवीन शासन निर्णयानुसार वेतन देण्यात यावे, अशा मागण्यांचे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केले आहे.
मजुर वर्गाची मजुरी अदा करण्यात आली असली तरी रोजगार सेवकांना ‘शून्य’ रक्कम मिळाल्याने नरेगाचा कणा असलेले हे कर्मचारी पूर्णतः नाराज झाले आहेत. त्यामुळे योजना थांबणार आणि त्याचा फटका सामान्य मजुरांनाही बसणार आहे.
भगवान कचरे, तालुका उपाध्यक्ष तथा रोजगार सेवक म्हणतात, “छोट्या मोठ्या कर्जांचे हफ्ते थकले आहेत, घरात अन्न नाही, आता तरी आमचे थकीत मानधन द्यावे.”
संपाच्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने निर्णय घेऊन मानधन अदा करावे, अन्यथा संपूर्ण मोखाडा तालुक्यात नरेगा योजना कोलमडण्याची शक्यता आहे.