सलग सुट्ट्यांमुळे पन्हाळा हाऊसफुल्ल; नगरपरिषदेच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ (File Photo)
पन्हाळा : इतिहासाचा साक्षीदार व थंड हवेचे ठिकाण म्हणून पन्हाळगडाची महती सर्वदूर आहे. येथील थंडगार निसर्गरम्य वातावरण, ऐतिहासिक गडकोट व किल्ले तसेच येथील प्रसिद्ध असलेले झुणका भाकर यामुळे पन्हाळगडावर पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. मुलांची दिवाळीची सुट्टी व त्यातच दिवाळी पाडवा, भाऊबीज व शनिवार, रविवार या सलग शासकीय व शाळांच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांचे लोंढेच लोंढे पन्हाळ्यात पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे पन्हाळगड पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाला आहे.
कोल्हापूर शहरापासून अवघ्या 20 किमी अंतरावर असलेल्या तसेच सांगली, सातारा या जिल्ह्यांनाही जवळ असणाऱ्या व सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडणाऱ्या पन्हाळगडावर नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. दिवाळीच्या सुट्टीमुळे येथील तीनदरवाजा, अंधारबाव, सज्जाकोठी, धान्याचे कोठार, पुसाटीबुरुज परिसर, तबक उद्यान, लता मंगेशकर बंगला परिसर, आकाशवाणी टॉवर परिसर, पावनगड, रेडेघाट येथे पर्यटकांचे जथेच्या जथे पाहावयास मिळत आहेत.
हेदेखील वाचा : Matheran News : दिवाळीच्या सुट्टीत पर्यटकांची माथेरानला पसंती; मात्र ‘या’ कारणासाठी येणारे पर्यटक नाराज
पर्यटकांच्या गर्दीमुळे लहान-मोठे व्ययसाय तेजीत सुरू आहेत. तर हॉटेल्स व लॉजिंगचे येत्या दिवाळीच्या सुट्टीचे बुकिंग असल्याचेही अनेक हॉटेलमालकांनी सांगितले. पर्यटकांच्या गर्दीमुळे पन्हाळा नगरपरिषदेच्या प्रवासी कर व वाहन कर यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दिवाळी सुट्टीत पाच लाख रुपयांची करवसुली झाल्याचे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. पन्हाळा गडावर सुमारे दीड लाख पर्यटकांनी विक्रमी हजेरी लावली. नगरपरिषदेमार्फत दाखवला जाणारा पन्हाळ्याचा रणसंग्राम लघुपट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असल्याचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांनी सांगितले.
खाद्यपदार्थांवर पर्यटक मारत आहेत ताव
भाजलेले व उकडलेले कणिस, पाणीपुरी, भेळ, रगडा, मिसळ, झुणका-भाकर या खाद्यपदार्थांवर ताव मारताना पर्यटक दिसत आहेत. दरम्यान, पन्हाळा येथे पर्यटकांच्या गर्दीमुळे वाहतुकीचा व वाहन पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे पर्यटकांनी सर्व गाड्या नगरपरिषदेच्या इंटरप्रिटिशन हॉलच्या बाजूच्या जागेत लावण्याची व्यवस्था नगरपरिषदेच्यामार्फत करण्यात आल्याचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांनी सांगितले.
लोणावल्यात होणार ‘टायगर पॉईंट’
दुसरीकडे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मंत्रालयात लोणावळा येथील कुरवंडे गावात प्रस्तावित टायगर पॉईंट प्रकल्पाबाबत ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या प्रकल्पासाठी ५ फेब्रुवारी २०२४ रोजीच ३३३ कोटी रुपयांची मान्यता मिळाली असून, पर्यटन विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प मावळ तालुक्याचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. यामुळे लोणावळ्याकडे पर्यटकांचा कल अधिक वाढणार आहे.






