मेघना बोर्डिकर प्रेस कॉन्फरन्स घेऊन पालिका निवडणुकीमध्ये यश मिळवू असा विश्वास व्यक्त केला (फोटो - सोशल मीडिया)
Political News : परभणी : जिल्ह्यातील ७ पैकी जिंतूर व सेलू नगराध्यक्ष पदे भाजपने मिळवली असून सोनपेठचे नगराध्यक्ष पद भाजप पुरस्कृत जनसुराज्य शक्तीच्या उमेदवाराला मिळाले आहे. नगर पालिका निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले असून मनपा निवडणुकीतही भाजप किती सक्षम पक्ष आहे ते दाखवून देऊ असे राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, जिंतूरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रताप देशमुख, सेलूचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत, सोनपेठचे नगराध्यक्ष परमेश्वर कदम, सेलुचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, “या निवडणुकीत ५५ ते ६० टक्के मुस्लिम मतदार भाजपच्या पाठीशी असल्याचे दिसून आले. नगर पालिका निवडणुकीत आजवर भाजपला यश मिळवता आले नव्हते. मात्र २०१४ पासून नरेंद्र मोदी पंतप्रधान पदी असून त्यांनी कुठल्याही योजनेचा गरजू व पात्र लाभार्थ्यांना लाभ देताना हिंदू मुस्लिम असा भेदभाव कधीच केला नाही. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला योजनांचा लाभ नक्की मिळतो ही जाणीव मुस्लिम समाजातील नागरिकांना झाली असल्यानेच त्यांची साथ या निवडणुकीत मिळाली, असा विश्वास मेघना बोर्डिकर यांनी व्यक्त केला.
हे देखील वाचा : EVM मशीनवरील राष्ट्रवादीच्या उमेदवारीचे नाव झाकले, निवडणुकीतील गैरकारभार चव्हाट्यावर
कमळ चिन्हावर जिल्ह्यात दोन नगराध्यक्ष आणि ३४ नगरसेवक निवडून आल्याचे त्यांनी सांगितले. जिंतूरात जेवढी मते नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला तेवढीच मते नगरसेवकांना मिळाली असून मुस्लिम मतदारांनी भरभरून मते दिली आहेत.
परभणी मनपा निवडणूक भाजप तयारीनिशी लढवणार असून दोन दिवसांत शिवसेनेसोबत युतीबाबत निर्णय होईल. आजवर खान पाहिजे की बाण पाहिजे हा अजेंडा राबवून दोन जाती धर्मात दरी निर्माण करण्याचे काम परभणीतील पुढाऱ्यांनी केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
हे देखील वाचा : RSS- काँग्रेसमध्ये वाद पेटणार? सरसंघचालकांच्या ‘त्या’ विधानावर उदीत राज यांची टीका; म्हणाले, “हिंमत असेल…”
गंगाखेड, मानवत येथे आम्ही चांगले नियोजन केले होते, मात्र यश मिळाले नाही. १७२ पैकी ८६ जागा लढवून भाजपने २ नगराध्यक्ष पदे आणि ३४ नगरसेवक पदे मिळवली आहेत. तसेच भाजप पुरस्कृत जनसुराज्य शक्तीचा एक नगराध्यक्ष व ८ नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास दाखवला आता मनपा निवडणुकीतही भाजप सर्वात मोठा राहील आणि हा पक्ष किती सक्षमपणे उभा आहे हे दिसून येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिंतूरचे नगराध्यक्ष प्रताप देशमुख, सेलूचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत, नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांच्यासह नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.






