परभणीत जमावबंदीचे आदेश लागू, शहरात इंटरनेट सेवाही बंद ठेवण्याचे आदेश (फोटो सौजन्य-X)
महाराष्ट्रातील परभणीमध्ये हिंसाचार उसळला आहे. दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परभणीत आज (बुधवारी) बंद पुकारण्यात आला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधान प्रतिकृतीच्या नुकसानीमुळे निषेधासाठी जमलेल्या जमावाने आंदोलनाला हिंसक वळण दिले. यावेळी घोषणाबाजी करत टायर पेटवून महामार्ग रोखून धरला. परभणी नांदेड महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. तसेच परभणीत जमावबंदीचे आदेश लागू करुन या शहरात इंटरनेट सेवाही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. संविधानाचा अवमान करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी आंदोलकांची मागणी आहे.
राज्यघटनेच्या अवमानावरून कालपासून सुरू असलेल्या निदर्शनेदरम्यान महाराष्ट्रातील परभणीमध्ये हिंसाचार उसळला. बुधवारी दुपारी आंदोलकांनी अनेक भागात जाळपोळ केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. संविधानाचा अवमान करणाऱ्यांना फाशी देण्याची मागणी आंदोलक करत आहेत. परभणीच्या घटनेवर बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.
मगळवारी काही समाजकंटकांनी परभणी रेल्वे स्थानकाबाहेरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचे नुकसान केले, त्यानंतर जाळपोळ आणि दगडफेक झाली. याच्या निषेधार्थ अनेक संघटनांनी शहरात बंदचे आवाहन केले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर संतप्त अनुयायांनी उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक केली. तर परभणी रेल्वे स्टेशनवर मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेससमोर नारे दिले आणि गाडी रोखून धरली. दरम्यान आज परभणीत कडकडीत बंद पाळण्यात आला. बुधवारी सकाळपासूनच शहरातील अनेक भागात बंद पाळण्यात आला. बाजारपेठा, दुकाने, शाळा-महाविद्यालयात शुकशुकाट दिसला.
जिल्हाभर सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास प्रतिबंध आहे. भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स केंद्र, ध्वनिक्षेपके व इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश केले आहेत. ११ डिसेंबरच्या दुपारी १ वाजेपासून हे आदेश लागू राहतील. ध्वनिक्षेपकावरून ते पोलिसांनी जाहीर करावे, असेही आदेशात म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदची अंमलबजावणी करण्यासाठी आलेल्या लोकांनी अनेक दुकानांची तोडफोड केली आणि पोलिसांवर दगडफेक सुरू केली. यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला. बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना २४ तासांत अटक करण्याची मागणी बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे (व्हीबीए) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आंबेडकर म्हणाले की, परभणीत जातीयवादी मराठा समाजकंटकांकडून बाबासाहेबांच्या पुतळ्यावर भारतीय संविधानाची अवहेलना करणे अत्यंत लज्जास्पद आहे. दलित अस्मितेचे प्रतिक असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याची अशी तोडफोड होण्याची ही पहिलीच वेळ नाही, असे त्यांनी म्हटले आहे. आंबेडकरांनी सर्वांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे.