सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे/चंद्रकांत कांबळे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडची दैनंदिन वाहतूक सांभाळणारी पीएमपीएमएल बस सेवा शहराची ‘रक्तवाहिनी’ मानली जाते. नव्या अध्यक्षांनी पदभार स्वीकारल्यानंतर डबल डेकर बस, चालकांसाठी मोबाईल बंदी, चालक-वाहकांना डेपोवर प्रत्यक्ष हजेरी बंधनकारक असे काही चांगले निर्णय घेतले. परंतू प्रवाशांना आवश्यक असलेल्या मूलभूत सोयींकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. प्रवाशांना बसमध्ये ऑनलाइन तिकिटासाठी टाळाटाळ करणे, बस थांब्यावर न थांबणे, ॲपवरून तिकिट काढण्यासाठी बस नंबर विचारले असता, बसमध्ये बसताना पाहिले नाही का? अशी उध्दटपणे उत्तरे देणे. प्रवाशी दरवाज्यात अडकणे वाहक आणि चालकांच्या निष्काळजीपणामुळे आणि उद्धट वर्तनामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
ऑनलाइन तिकिटाचा त्रास
प्रवाशांना सुलभता मिळावी यासाठी पीएमपीएमएलने अधिकृत ॲप आणि ऑनलाइन तिकिट सेवा सुरू केली. मात्र प्रत्यक्षात अनेक प्रवासी सांगतात की कंडक्टर स्कॅनरवरून तिकीट देताना टाळाटाळ करतात.
अनेक थांब्यावर बस थांबतच नाही
संध्याकाळी ऑफिस सुटण्याच्या वेळेत अनेक बस ठराविक थांब्यावर न थांबण्याची समस्या वाढली आहे. करुळी, मोशी, चिंबळी, चाकण एमआयडीसी, भोसरी एमआयडीसी या भागात आणि उपनगरात हे प्रमाण जास्त असल्याचे नवराष्ट्रच्या प्रतिनिधींनी पाहणी करताना लक्षात आले. संबंधित डेपो मॅनेजर यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी “बसचा नंबर द्या, कारवाई करू” असे सांगितले. मात्र बस इतक्या वेगाने निघून जाते की क्रमांक नोंदवणे किंवा फोटो काढणे अवघड ठरते.
प्रवाशांचा जीव धोक्यात
वृद्ध, महिला, लहान मुले यांना दररोज धोकादायक प्रवासाचा सामना करावा लागतो. काहीवेळा बस सुटताना दरवाजे अचानक बंद होतात आणि प्रवासी अर्धा आत–अर्धा बाहेर अशी भयावह स्थिती निर्माण होते. बॅगा, हात दरवाज्यात अडकण्याचे प्रसंग नेहमीच घडतात.
प्रवाशांचा मनस्ताप
कंडक्टर-चालकांचे उध्दट वर्तन, ऑनलाइन तिकीटातील अडथळे आणि बस थांबत नसल्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. काही वेळा वाद विवाद भांडणापर्यंत जातात. प्रशासनाने आधुनिक ॲप आणि ऑनलाइन तिकिटाची सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी त्याचा खरा फायदा मिळत नाही. नव्या अध्यक्षांनी सुधारणा सुरू केल्या असल्या तरी बस वेळेवर थांबणे, तिकीट प्रक्रियेत पारदर्शकता आणि प्रवाशांशी सभ्य संवाद यासारख्या मूलभूत बाबींवर ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. जोपर्यंत या प्राथमिक तक्रारींचे निराकरण होत नाही, तोपर्यंत शहराची ही “रक्तवाहिनी” असलेली पीएमपीएमएल सेवा प्रवाशांसाठी मनस्तापाचीच ठरेल.
“क्यूआर कोडवरून तिकीट न काढणाऱ्या आणि प्रवाशांशी उद्धटपणे वागताना आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित केले जाईल. यासंदर्भात उद्या सर्व चेकरांची बैठक बोलावण्यात आली आहे.”
— पंकज देवरे, व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष, पीएमपीएमएल.
“पीएमपी बसच्या दरवाज्यात माझी बॅग चार–पाच वेळा अडकली आहे. सकाळी कुरुळीहून पुण्यात कॉलेजसाठी येताना त्या थांब्यावर बस थांबतच नाही. त्यामुळे नेहमी उशीर होतो.”
– प्रियंका लोकडे, (विद्यार्थिनी)
“या सर्व समस्या जुनेच आहेत. या संदर्भात पीएमपी प्रशासनाशी बोलले असता ‘आम्ही कारवाई करणार, सुधारणा करणार’ अशी उत्तरे दिली जातात; परंतु प्रत्यक्षात काहीच घडत नाही. पीएमपी बसमध्ये चढताना अनेक प्रवासी अडकतात. याचे कारण म्हणजे बसमध्ये प्रवासी आत चढला आहे की नाही हे पाहण्यासाठी लावलेले कॅमेरे अनेकदा बंद असतात किंवा योग्यरीतीने बसवलेले नसतात. या सर्व व्यवस्थेला त्यांनी मोडकळीस आणले आहे. या व्यवस्थेचे प्रमुख म्हणून पीएमपीचे अध्यक्ष याला जबाबदार आहेत.”
— संजय शितोळे, पीएमपी प्रवासी मंच