मुंबई : आगामी निवडणूकांसाठी भाजपने जोरदार तयारी केली असून प्रचार देखील केला जात आहे. ‘मोदी सरकारची हमी’ या टॅगलाइनसह भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणूकीचा प्रचार केला आहे. दरम्यान, आता शिधावाटप करणाऱ्या पिशव्यांवर देखील नरेंद्र मोदी यांचा फोटो व टॅगलाईन देण्यात आली आहे.
मार्च महिन्याचे धान्य खरेदी करण्यासाठी शिधावाटप दुकानावर जाणाऱ्या लाभार्थ्यांना ‘मोदी सरकारची हमी, सर्वाना धान्य’ असा मजकूर असलेल्या पिशव्या दिल्या जात आहेत. तसेच त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र देखील आहे. निवडणूका आता जवळ आल्यामुळे पुढील पाच वर्षे मोफत धान्य वितरणाची हमी देखील या पिशव्यांवरील मजकुरातून देण्यात आली आहे. त्यामुळे भाजप सरकारने प्रचारासाठी आता शिधावाटपाच्या पिशव्या देखील वापरल्या आहेत.
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय कुटुंबांना दरमहा ३५ किलो, तर प्राधान्य कुटुंबांना प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य वितरण केले जात आहे. याच योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षे ८० कोटी लाभार्थ्यांना मोफत धान्य दिले जाणार आहे. यासाठी केंद्र सरकार १२ लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. ही मोदी सरकारची हमी असल्याचे धान्य वितरण पिशव्यांवर नमूद केले आहे. ‘‘पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा उद्देश एकच आहे- माझा कोणीही बंधू वा बहीण, माझा भारतवासी उपाशी राहू नये,’’ असा मजकूर आणि त्याखाली पंतप्रधान मोदी यांची स्वाक्षरी आहे.