ठाणे : आज देशाच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८२ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरातील चित्रकार सुमन दाभोलकर यांनी त्यांचे स्टोन आर्ट पोट्रेट साकारले आहे. मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली गावाचे असणारे सुमन त्यांच्या गावातील नदी काठी सापडणाऱ्या विविध आकारी दगडांवर रंगांची उधळणं करून व्यक्तींची हुबेहूब चित्र रेखाटतात. अशाच एका दगडावर शरद पवार यांचे चित्र काढले आहे.
सर्वाधिक स्टोन आर्ट पोट्रेट साकारल्याबद्द्ल चित्रकार सुमन दाभोळकर यांची 29 मे 2021 रोजी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली. यापूर्वी त्यांनी अमिताभ बच्चन, नाना पाटेकर, स्वप्नील जोशी, महेंद्र सिंह धोनी, उद्धव ठाकरे, इंदिरा गांधी, अब्दुल कलाम, छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले अशा अनेक मान्यवरांची स्टोन आर्ट पोट्रेट साकारली आहेत.
नदी काठी मला ज्या नैसर्गिक आकारातील दगड सापडला त्यातून मला शरदचंद्रजी पवार यांचे स्टोन आर्ट साकारण्याची कल्पना सुचली. दगडाचे मूर्तस्वरूप न बदलता मी हे स्टोन आर्ट साकारले आहे. आज त्यांच्या वाढदिवसा निमित्त माझ्या कलेच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केला आहे, असे सुमन दाभोलकर (चित्रकार) यांनी सांगितले.