File Photo : PM Modi
जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (दि.25) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा कामाला लागली आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते जळगाव येथे लखपती दीदी योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे. या निमित्ताने भाजपचा विधानसभा निवडणुकीचा प्रचार देखील सुरू होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात लखपती दीदी योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत देशभरातील खेड्यातील दोन कोटी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणात महिलांना प्लंबिंग, एलईडी बल्ब बनवणे आणि ड्रोन चालवणे आणि दुरुस्ती करणे अशा अनेक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यात आता लखपती दीदी योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे.
त्यानुसार, पंतप्रधान मोदी सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल होतील. तिथून हेलिकॉप्टरद्वारे जळगावकडे रवाना होतील. मोदी बचतगटाच्या महिलांशी संवाद साधतील. त्यानंतर लखपती दीदी कार्यक्रमाला हजेरी लावतील, असा त्यांचा नियोजित दौरा आहे.
जळगावचा पहिला दौरा
पंतप्रधानांच्या जळगाव दौऱ्याबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी सांगितले, ‘उद्या पंतप्रधान मोदी जळगावचा पहिला दौरा करणार आहेत. त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात लखपती दीदी बनलेल्या दीड लाख महिला या कार्यक्रमात सहभागी होतील’.
संध्याकाळी 4 वाजता जोधपूर
महाराष्ट्रातील दौरा, कार्यक्रम आटोपून पंतप्रधान मोदी रविवारी संध्याकाळी चार वाजता जोधपूर विमानतळावर पोहोचतील. सुमारे दोन तास या कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर पंतप्रधान मोदी दिल्लीला रवाना होतील.