शिक्रापुर : पुणे जिल्ह्यातील हिट अँड रण प्रकरणात एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दारुच्या नशेत आलिशान पोर्शे कार चालवून दोघांना उडवल्याची घटना देशभरात गाजत असताना नुकतेच शिरुर तालुक्यात या पोर्शे पॅटर्नचीचं पुनरावृत्ती झाली असुन एका पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने मालवाहू पिकअप चालविताना दुचाकीला धडक दिल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू होऊन एक तरुण गंभीर जखमी झाला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पोलीस पाटलासह त्याच्या अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरणगाव (ता. शिरुर) येथील वडगाव बांडे रस्त्याने अरुण मेमाणे व मच्छिंद्र बांडे हे दोघे त्यांच्या जवळील एमएच १२ व्ही आर २०७२ या दुचाकीहून चाललेले असताना अचानक आरणगावचे पोलीस पाटील संतोष लेंडे यांची एमएच १२ एस एफ ३४३९ हि पिकअप पोलीस पाटील यांची अल्पवयीन मुलगी चालवत असताना अचानकपणे पिकअपची मेमाणे यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली.
दरम्यान पिकअपने दुचाकीसह दोघांना काही अंतर फरपटत नेले यावेळी पोलीस पाटील संतोष लेंडे देखील त्यांच्या अल्पवयीन युवती शेजारी बसलेले होते मात्र अपघात होताच शेजारील नागरिकांनी दुचाकीवरील दोघांना शिरुर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवले, मात्र उपचारापूर्वीच अरुण विठ्ठल मेमाणे (वय ३०) रा. वडगाव बांडे (ता. दौंड) जि. पुणे याचा मृत्यू झाला तर महिंद्र रावसाहेब बांडे (वय २६) रा. वडगाव बांडे (ता. दौंड) जि. पुणे हा जखमी झाला.
अपघातानंतर पोलीस हवलदार किशोर तेलंग व लहानू बांगर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी देखील केली. तर याबाबत सतिश विठ्ठल मेमाणे (वय २६) रा. वडगाव बांडे (ता. दौंड) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी आरणगावचे पोलीस पाटील संतोष लेंडे निवृत्ती व त्यांची अल्पवयीन युवती दोघे रा. आरणगाव (ता. शिरुर) जि. पुणे या दोघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे हे करत आहे.
पोलीस पाटलांनी केला पोलीस स्टेशनला फोन
आरणगाव येथे पिकअप व दुचाकीचा अपघात घडल्यानंतर पोलीस पाटील संतोष लेंडे यांनी स्वतः शिक्रापूर पोलीस स्टेशन तसेच तळेगाव ढमढेरे पोलीस चौकीमध्ये फोन करुन अपघाताची माहिती दिली असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे.