रायगड – अलिबाग ः रायगड जिल्ह्यात पाेलीस शिपाई पदाच्या 272 आणि चालक पोलीस शिपाईच्या सहा पदासांठी एकूण 19 हजार 823 अर्ज प्राप्त झाले आहेत. 3 जानेवारी ते 22 जानेवारी 2023 पर्यंत भरती प्रक्रियेला पार पडणार आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने पार पडावी यासाठी रायगड पोलीस सज्ज झाले आहेत. उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता मैदानी आणि लेखी परिक्षा द्याव्यात असे आवाहन रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे. पोलीस भरती प्रक्रियेच्या तयारीबाबत आढावा त्यांनी घेतला त्यानंतर पोलीस मुख्यालयातील जंजीरा सभागृहात पत्रकार परिषद पार पडली. त्या प्रसंगी घार्गे बोलत होते.
भरती प्रक्रियेचा सर्वांनीच पावित्र्य राखले पाहिजे. यासाठी रायगड राज्य गुप्त वार्ता विभाग, लाचलुचपत विभाग यांच्यासह सायबर सेलची मदत घेतली जात आहे. उमेदवारांनी कोणत्याही आर्थिक व्यवहार करू नयेत. भरती प्रक्रियेसाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी, अंमलदार यांचे अंडर टेकींग घेतले आहे. त्यामध्ये त्यांचा नातेवाईक या भरतीमध्ये समाविष्ट नसल्याबाबत त्यांच्याकडून लिहून घेण्यात आले आहे. तसेच मैदानी खेळावर नजर ठेवण्यासाठी सुरुवात ते शेवट या टप्प्यात तब्बल 70 सीसीटीव्ही कॅमेर बसवण्यात आले आहेत. 53 पाेली अधिकारी, 367 पाेलीस अंमलदार हे देखील लक्ष ठेऊन असणार आहेत. साध्या वेशातील 20 पाेलीस प्रत्यक्षपणे मैदानावर हजर राहणार आहेत.
डमी उमेदवार टाळण्यासाठी बायोमॅट्रीक पडताळणी हाेणार आहे. प्रत्येक इव्हेंटचे व्हिडिओ रेकाॅर्डींग हाेणार आहे. प्रत्येक इव्हेंटसाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. सरकारने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आरक्षण पध्दती लागू राहणार आहे, असे घार्गे यांनी सांगितले.
या प्रसंगी अपर पाेलीस अधिक्षक अतुल झेंडे, पोलीस उपअधीक्षक (गृह) जगदीश काकडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक सुषमा सोनावणे, राज्य गुप्तवार्ता विभागाचे रायगड युनिटचे पोलीस उपअधीक्षक सुरज पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे उपस्थित होते.
राहण्याची व्यवस्था कुरुळ येथील माळी समाज हाॅलमध्ये
उमेदवार एसटी स्टॅण्ड, समुद्र किनारी अशा काेणत्याही ठिकाणी आसरा घेतात. त्यामुळे त्यांच्या राहण्याची व्यवस्था कुरुळ येथील माळी समाज हाॅलमध्ये करण्यात आली आहे. भरती स्थळापासून अंतर जास्त असल्याने उमेदवारांची ने आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
भरतीच्या ठिकाणी माेफत फळांचे स्टाॅल
काही उमेदवारांकडे खाण्यासाठी पैसे नसतात. त्यामुळे त्यांच्या खाण्याची अबाळ हाेऊ नये यासाठी भरतीच्या ठिकाणी माेफत फळांचे स्टाॅल उभारण्यात आले आहेत. तसेच पैसे खर्च करुन अन्य पदार्थांचे स्टालही उभारण्यात आले आहेत. मैदानी खेळासाठी प्रत्येक उमेदवारांना तीन संधी देण्यात येणार आहेत. त्यामुळे पहिल्या संधीचा फायदा घेता आला नाहीतरी, पुढील संधीचा त्याला फायदा घेता येणार आहे.
पुरुष उमेदवारांना 100 आणि 1600 मिटर धावणे, गाेळा फेकणे हे इव्हेंट पार करावे लागणार आहेत, तर महिला उमेदवारांना 100 आणि 800 मिटर धावणे आणि गाेळा फेक हे इव्हेंट पार करावे लागणार आहे. प्रत्येक उमेदवारांच्या फेरीचे मार्क तक्त्यात भरून त्यावर अंमलदार स्वाक्षरी करणार आहेत. मैदानी खेळामध्ये उमेदवारांना किती मार्क मिळाले आहेत. याची यादी दुसऱ्या दिवशी फलकावर तसेच वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यावर काही आक्षेप असल्यास सात दिवसात संबंधीत उमेदावर तक्रार देऊ शकताे.
पहिल्या दिवशी 800 उमेदवारांची मैदानी चाचणी हाेणार आहे. त्यानंतर 1200 उमेदवारांची मैदानी चाचणी पार पडणार आहे. त्यात्या दिवशी येणाऱ्या उमेदवारांची भरती चाचणी संपवण्याचा प्रयत्न पाेलीस प्रशासनाचा राहणार आहे. उमेदवार कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. यासाठी राज्य गुप्त वार्ता विभाग, लाचलुचपत विभाग, सायबर सेल, तसेच साध्या वेशातील 20 पाेलीस तैनात करण्यात आले आहेत. सायबर सेल विविध समाज माध्यमांच्या पाेस्ट, मेसेजवर नजर ठेवणार आहे.
पाेलीस शिपाई पदाच्या 272 आणि चालक पाेलीस शिपाईच्या सहा पदासांठी एकूण 19 हजार 823 अर्ज प्राप्त झाले आहेत. म्हणजे एका जागेसाठी सुमारे 72 अर्ज आल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला आपला बेस्ट द्यावा लागणार आहे. मैदानी परिक्षा उर्तीण झालेल्यांची लेखी परिक्षा फेब्रुवारी 2023 मध्ये पार पडणार आहे.