सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून प्रणिती शिंदे (Praniti Shinde) उतरणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushil kumar Shinde) यांनी केली. ‘मी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रणिती शिंदे याच काँग्रेसच्या उमेदवार असतील’, असे शिंदे यांनी म्हटले आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सुशीलकुमार शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. तसेच येथील स्मारकला भेट दिली. यावेळी शिंदे यांनी प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीबाबत घोषणा केली. शिंदे म्हणाले की, दरवर्षी आम्ही जयंती आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतो. मात्र, योगायोगाने मी आज सोलापुरात आहे. त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करायला आलो आहे.
पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच देशात सार्वत्रिक निवडणुका लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता आमदार प्रणिती शिंदे याच काँग्रेसच्या उमेदवार असतील, या संदर्भात मला जी करता येईल ती मदत मी करणार असल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे.