सौजन्य - नवराष्ट्र टीम
यावेळी मागील १२ वर्षांपासून वानवडी साळुंखे विहार भागातील नागरिकांनी भाजपचे खासदार, आमदार, मंत्री झालेले पाहिले. पण या नेतेमंडळींच्या राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे येथील भागाचा विकास होऊ शकला नाही. आज आम्ही प्रचाराच्या निमित्ताने नेताजीनगर, बोराडेनगर भागातील नागरिकांशी संवाद साधला असता, या नागरिकांनी तक्रारीचा पाढा वाचून दाखवला. त्याबाबत सांगायचे झाल्यास नेताजीनगर ही सोसायटी जवळपास ३० वर्षांपूर्वीची असून या सोसायटीचा पुनर्विकास झाला पाहिजे. मात्र, या महत्वपूर्ण प्रश्नांकडे भाजपच्या कोणत्याही नेत्यांने लक्ष दिले नाही. यामुळे आता निवडणुकीत नागरिकांनी भाजप नेत्यांना जाब विचारला पाहिजे, असे आवाहन देखील नागरिकांना प्रशांत जगताप यांनी केले.
बोराडेनगर भागातील एकूणच परिस्थिती पाहता त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाच्या पायभूत सुविधा देण्यात हे भाजपचे नेते अपयशी ठरले आहेत. या दोन्ही भागाचा विकास करण्यास आम्ही काँग्रेस पक्षाचे चारही उमेदवार कटिबद्ध असून आम्ही निवडून आल्यावर नक्कीच नेताजीनगर, बोराडेनगर भागाचा कायापालट करणार असल्याचे आश्वासन प्रशांत जगताप यांनी दिले.
प्रशांत जगताप यांचा महायुतीवर निशाणा
महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत भाजप आणि महायुती सरकारवर विविध विषयांवरून विरोधक टीका करत आहेत. काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांनीही सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून सरकारला लक्ष्य केले आहे. ही योजना फक्त निवडणुका जिंकण्यासाठीच सुरू केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही योजना कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर गायब करतील. लाडक्या बहिणींना ते सावत्र बहिण करतील. याचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या तिजोरीत ज्या प्रकारे खडखडात झाला आहे. त्यानुसार त्यांना काहीतरी निर्णय घ्यावा लागेल, असे जगताप म्हणाले. तसेच भाजप सरकारने लाडकी बहीण योजना मागे घेऊ नये, असंही त्यांनी नमूद केलं आहे. असे केल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असे प्रशांत जगताप यांनी सांगितले. त्या लाडक्या बहिणींची फसवणूक भाजपनं केली तर त्याच लाडक्या बहिणींना घेऊन आम्ही या मंत्र्यांच्या गाड्या अडवू, असे त्यांनी म्हटले आहे.






