पुणे-सोलापूर हायवेवर बसचा अपघात (फोटो- टीम नवराष्ट्र)
पाटस: पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर कडून पुण्याकडे जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स लक्झरी बस ने समोर चाललेल्या मालवाहतूक ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर या अपघातात दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अशी माहिती दौंड पोलिसांनी दिली. विक्रम मोहन जगताप (वय ३४, राहणार भातागळी तालुका लोहारा. जिल्हा धाराशिव.) असे या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे.
ही घटना बुधवारी (दि २५) पहाटे साडेपाच वाजण्याच्या आसपास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील खडकी जवळील हॉटेल विसावा जवळ घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सोलापूर वरून खाजगी ट्रॅव्हल्स बस ही पुण्याला जात असताना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील खडकी जवळ आल्यावर ही बस समोरून जात असलेल्या ट्रकला जाऊन पाठीमागे धडकली.
या खाजगी बसचा वाहन चालक हा भरधाव वेगाने वाहन चालवत असल्याने वाहनावरील ताबा सुटल्याने तो समोर जात असलेल्या ट्रकला जाऊन धडल्याने हा अपघात झाला. अशी माहिती प्रथमदर्शीय प्रवाशांनी पोलिसांना दिली. या अपघातात दत्ता साहेबराव शेंगोळे (रा. शेंगोळे ) संध्या पांचाळ, अमोल पंचाळ (दोन्ही रा. पुणे ) ,शामल रोडगे, महेश रोडगे दोन्ही (रा. उदगीर ), मैनाबाई आदमाने,मीनाक्षी पाटील, शाहुराज पाटील, सुभाष माने , विमल दिवटे ( सर्व रा. लातुर ) या प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याने भिगवण येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत .
दरम्यान, या अपघातातील मृत विक्रम जगताप याचा भाऊ किरण जगताप याने दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने ट्रॅव्हल्स बस चालक शांताराम तुकाराम खंडेराव (रा. बेधरवस्ती ,तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव) याच्या विरोधात भरधाव वेगाने वाहन चालवणे, वाहतूकीच्या नियंमानांचे उल्लंघन करणे आणि अपघातास कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नवनाथ भागवत करीत आहेत.
हेही वाचा: पुण्यात भीषण अपघात; मद्यधुंद कार चालकाची 5 वाहनांना धडक
मद्यधुंद कार चालकाची 5 वाहनांना धडक
पुण्यातील छत्रपती शिवाजी रस्त्यावर मद्यधुंद मोटारचालकाने मंगळवारी रात्री एकापाठोपाठ पाच वाहनांना धडक दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नागरिकांनी कारचालकाचा पाठलाग करून त्याला शिवाजीनगर भागातील दीपबंगला चौकात पकडले. चतु:शृंगी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी खडक पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
दयानंद केदारी असे ताब्यात घेतलेल्या चालकाचे नाव आहे. छत्रपती शिवाजी रस्त्यावर प्यासा हॉटेलसमोर केदारीने एका दुचाकीस्वाराला धडक दिली होती. अपघातानंतर तो पसार झाला होता. त्यावेळी त्याने एकापाठोपाठ चार ते पाच वाहनांना धडक दिली. दुचाकीस्वाराने त्याचा पाठलाग सुरू केला. मात्र, तो शिवाजीनगर भागातून दीपबंगला चौकात गेला. दुचाकीस्वाराने त्याला पाठलाग करुन पकडले. त्याने या घटनेची माहिती त्वरीत चतु:शृंगी पोलिसांन दिली. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी करुन पुढील कायदेशीर कारवाईसाठी खडक पोलिसांच्या ताब्यात दिले, अशी माहिती चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी दिली.