पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; मुख्यमंत्र्यांसह परराष्ट्रमंत्री, रेल्वेमंत्रीही राहणार हजर (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन (वेव्हज्) शिखर परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होणार आहे. या वेव्हज् परिषदेचे यजमानपद महाराष्ट्र शासन भूषवित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, सांस्कृतिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे.
‘कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रिज’ या घोषवाक्याखाली होणाऱ्या या चार दिवसीय शिखर परिषदेत भारताला मीडिया, मनोरंजन आणि डिजिटल नवप्रवर्तनाचे जागतिक केंद्र म्हणून प्रदर्शित करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि प्रतिभेच्या एकत्रिकरणाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत असलेल्या या वेव्हज् मध्ये चित्रपट, ओटीटी, गेमिंग, कॉमिक्स, डिजिटल मीडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता, एव्हीजीसी-एक्सआर ब्रॉडकास्टिंग आणि नव्या तंत्रज्ञानाचा समावेश असेल.
भारताच्या मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील सामर्थ्याचे हे सर्वांगीण प्रदर्शन असेल. या उपक्रमाच्या माध्यमातून २०२९ पर्यंत ५० अब्ज डॉलर्सच्या बाजारपेठेचे दरवाजे उघडले जातील, असा अंदाज आहे.
25 देशांचे मंत्री सहभागी होणार
या शिखर परिषदेत प्रथमच ‘ग्लोबल मीडिया डायलॉग’चे आयोजन मुंबईत होणार आहे. भारताच्या जागतिक मीडिया क्षेत्रातील सहभागात हा एक ऐतिहासिक टप्पा ठरेल. वेव्हज् बजार या जागतिक ई-मार्केटप्लेसमध्ये 6100 पेक्षा अधिक खरेदीदार, 5200 विक्रेते आणि 2100 प्रकल्प सहभागी होणार आहेत, ज्यातून स्थानिक व जागतिक स्तरावर व्यवसाय आणि नेटवर्किंगच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.
वेव्हज परिषदेमध्ये 90 हून अधिक देश
या परिषदेत पंतप्रधान मोदी क्रिप्टोस्पियरला भेट देऊन ‘क्रिएट इन इंडिया’ उपक्रमांतर्गत निवड झालेल्या सर्जनशील कलाकारांशी संवाद साधणार आहेत. याशिवाय, ते भारत पॅव्हिलियन, महाराष्ट्र पॅव्हेलियनला देखील भेट देतील. या स्पर्धेसाठी एक लाखांहून अधिक नोंदणी झाली.
90 पेक्षा अधिक देशातील लोक राहणार हजर
वेव्हज परिषदेमध्ये ९० हून अधिक देश, १० हजार प्रतिनिधी, १ हजार कलाकार, ३०० हून अधिक कंपन्या आणि ३५० हून अधिक स्टार्टअप्स सहभागी होणार आहेत. शिखर संमेलनात ४२ मुख्य सत्रे, ३९ विशेष सत्रे आणि ३२ मास्टरक्लासेस आयोजित करण्यात येणार आहेत, ज्यामध्ये ब्रॉडकास्टिंग, इन्फोटेन्मेंट, एव्हीजीसी-एक्सआर चित्रपट आणि डिजिटल मीडिया यांसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश असेल.