पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराच्या कार्यक्रमानिमित्ताने आज (१ ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येत आहेत. सुमारे दीड वर्षांनंतर पंतप्रधान पुण्यात येत असून, या दौऱ्यात मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन, विविद विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही करणार आहेत.
मेट्रो प्रकल्पातील वनाज ते गरवारे महाविद्यालय मार्गावरील मेट्रोच्या उद्घाटनानिमित्ताने पंतप्रधान मार्च २०२२मध्ये पुण्यात आले होते. त्यानंतर जवळपास दीड वर्षांनी ते पुन्हा पुण्यात येत आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात आरती करून पंतप्रधानांचा पुणे दौरा सुरू होणार आहे. त्यानंतर ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमाला उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारणार आहेत. पुणे मेट्रो टप्पा १च्या काम पूर्ण झालेल्या फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक, तसेच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या दोन मार्गिकांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारलेली १२८० हून अधिक घरे, तर पुणे महापालिकेने बांधलेली २६५० हून अधिक घरे पंतप्रधानांच्या हस्ते हस्तांतरित केली जाणार आहेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात येणाऱ्या सुमारे ११९० घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या ६४०० हून अधिक घरांची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.